दरम्यान, नारायणगाव येथील उपबाजार केंद्रातील तीन टोमॅटो व्यापाऱ्यांचे परवाने यापूर्वी रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती ॲड. काळे यांनी दिली .
कृषी उत्पन्न बाजार समितीचे नारायणगाव उपबाजार केंद्र टोमॅटो साठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, या मार्केटमध्ये शेतकऱ्यांना टोमॅटोचे सकाळी एक बाजार भाव तर दुपारी त्यापेक्षा कमी बाजारभाव मिळत असल्याचे निदर्शनास येताच सभापती ॲड. संजय काळे यांनी सर्व टोमॅटो व्यापारी यांची बैठक नारायणगाव उपबाजार केंद्रात घेतली. या बैठकीला उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक निवृत्ती काळे, सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद धोंगडे व सर्व टोमॅटो व्यापारी उपस्थित होते .
सर्व व्यापाऱ्यांनी टोमॅटोची खरेदी सकाळी ८ वा. सुरू करून सकाळी असणारे बाजारभाव दुपारी २ वाजेपर्यंत सारखेच ठेवावे तसेच टोमॅटोची प्रतवारी व ग्रेडिंग नुसार मालाची विक्री करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची होती. या मागणीस अनुकूलता दर्शवून सभापती ॲड. संजय काळे यांनी सकाळी ८ ते दुपारी २ वाजे पर्यंत टोमॅटोचे दर सारखेच ठेवावेत अशी सूचना व्यापाऱ्याना केली . टोमॅटोच्या खरेदीसाठी परराज्यातील व्यापारी बांधवांशी संपर्क करण्यात आला आहे, लवकरच हे व्यापारी खरेदीसाठी येणार आहेत, अशी माहिती सभापती ॲड. संजय काळे यांनी दिली.
उपबाजार केंद्रातील टोमॅटो परवानाधारक महेश मधुकर शिंगोटे, संदीप सखाराम काकडे, सुजित सुभाष चव्हाण व मदतनीस सुरज दीपक अडसरे यांचे टोमॅटो व्यापारी लायसन्स रद्द करण्यात आलेले आहे. या व्यापाऱ्यांची शेतकरी बांधवांनी कोणतेही आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार बाजार समितीच्या आवारात अथवा आवाराच्या बाहेर करु नये, असे सभापती ॲड. संजय काळे यांनी सर्व शेतकऱ्यांना केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर अंतर्गत असलेल्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रातील टोमॅटो व्यापाऱ्यांशी संवाद साधताना सभापती ॲड. संजय काळे, यावेळी उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक निवृत्ती काळे, सचिव रुपेश कवडे , उपसचिव शरद धोंगडे हे उपस्थित होते.