बारामती : मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. टोमॅटोवर तिरंगा रोगाने थैमान घातल्याने अक्षरश: टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. या रोगावर कोणताही उपाय चालत नसल्याने शेतकऱ्याला एकरी दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. इंदापूर तालुक्यातील लासुर्णे, निमगाव केतकी, अंथुर्णे परिसरात टोमॅटोचे पीक घेण्यात येते. टोमॅटोच्या रोपापासून, ते मल्चिंग पेपरवरील लागवड, झाडांना आधार देण्यासाठी तार-काठी, लागवडीची मजुरी यावर शेतकऱ्यांनी १ लाख रुपयांच्या वर खर्च केला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून परिसरात पाऊस पडत आहे. सलग पडणाऱ्या या पावसामुळे टोमॅटोवर फळमाशी व तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेकडो किलो टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या रोगावर कोणत्याही प्रकारच्या फवारणीचा उपयोग होत नाही. खराब वातावरणामुळे रोग वाढत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक रोगाने नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यात टोमॅटोचे भाव निचांकी पातळीवर आले आहेत. त्यामुळे रोग व कमी दरामुळे शेतकऱ्यांना दुहेरी नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.बारामती : इंदापूर, बारामती तालुक्याच्या माळेगाव आणि भवानीनगर परिसरात ऊसपिकावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. भवानीनगर येथील श्री छत्रपती कारखान्याच्या २ ते ५ टक्के कार्यक्षेत्रामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील ऊसपीक अडचणीत आले आहे. आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यापासून हुमणी किडीचा प्रादुर्भाव ऊसपिकावर आढळून येत आहे. अगोदरच अपुऱ्या पर्जन्यमानाचा फटका ऊसक्षेत्राला बसला आहे. त्यातच आता हुमणीचादेखील काही प्रमाणात परिणाम झाला आहे.‘छत्रपती’च्या कार्यक्षेत्रातील सणसर, लासुर्णेसह मुरमाड जमिनीत असणाऱ्या कार्यक्षेत्रात ऊसपिकावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथील ऊसपीक पूर्णपणे अडचणीत आले आहे. सध्या सुरू झालेल्या पावसामुळे हुमणीच्या प्रादुर्भावामध्ये घट झाली आहे. उसाच्या मुळाशी या किडीची लागण होते. त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास ऊसपीक सोडून द्यावे लागते. ही कीड उसाच्या मुळ्या खाऊन टाकते. त्यामुळे पोषणाअभावी ऊस जळून जातो, असे शेतकऱ्यांनी सांगितले.याबाबत कृषिविज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी सांगितले, की शेती नांगरटीच्या काळात बगळे, इतर पक्षी येतात. या वेळी जमिनीवर आलेल्या सुप्त अवस्थेतील अळ्या, कोष खातात. पहिल्या पावसानंतर जमिनीतून भुंगेरे वर येतात. संध्याकाळी हे भुंगेरे बांधावरील सुबाभूळ, लिंंब इतर काटेरी झाडांवर चढतात. रात्री झाडावर नरमादींचे मिलन होते. सूर्याेदयापूर्वी हे भुंगेरे परत जमिनीत जातात. त्यानंतर मादी जमिनीत अंडी घालते. अंड्यांची संख्या त्या ठिकाणावर अवलंबून असते. सुमारे ३५ ते ५० अंडी असतात. त्यानंतर हुमणीचा प्रादुर्भाव होतो. प्रादुर्भाव टाळण्यासाठी बांधांवरील झाडांवर कीटकनाशक फवारणी, धुरळणी करावी अथवा झाडांवर भ्ांुगेरे बसण्याची सायंकाळी प्रतीक्षा करावी. त्यानंतर झाड हलवून खाली पडलेले भुंगेरे रॉकेलमिश्रित पाण्यात टाकावेत. तसेच, प्रकाश सापळे लावल्यास तेथे भुंगेरे एकत्र येतात. खाली घमेल्यात औषधमिश्रित पाण्यात पडून हे भुंगेरे मृत्युमुखी पडतात. याशिवाय, शेणखतामध्ये मेटारायझियम अनीसोपित्ती किंवा बिव्हेरिया बासियाना या जैविक बुरशी ८ किलो एकरी या प्रमाणात शेणखताबरोबर पसराव्यात. त्यामुळे अंड्याला बुरशी लागण होउन हुमणी, वाळवी नष्ट होण्यास मदत होते. (प्रतिनिधी)
टोमॅटोवर तिरंगा, तर उसावर हुमणी!
By admin | Published: October 04, 2016 1:37 AM