नारायणगाव : येथील उपबाजार केंद्रात गुरुवारी टोमॅटोला २० किलो कॅरेटला ३० रुपये बाजारभाव मिळाला. किलोला दीड ते दोन रुपये भाव मिळल्याने शेतकरी संतप्त झाले़ व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन टोमॅटोला ३० रुपये कॅरेट बाजारभाव देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचे लक्षात येताच संतप्त शेतकऱ्यांनी आज (दि़ ३१) पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको करून निषेध केला़ उत्पादन खर्चही या बाजारभावात निघाणार नसल्याने, टोमॅटोला चांगला बाजारभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे १ तास रास्ता रोको केला़ हा रास्ता रोको शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर, कार्याध्यक्ष होनाजी बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली राजू चव्हाण, महेंद्र इंदोरे, बाबा गायकवाड, रमेश कोल्हे, आशिष वाजगे, भीमाजी गोरडे, प्रसाद भोर, नरेंद्र गोरडे, रघुनाथ सोनवणे, श्रीराम डोके आदी टोमॅटो उत्पादक व इतर शेतकऱ्यांनी केला़ या वेळी प्रभाकर बांगर यांनी सांगितले की, उत्पादनखर्च, पीक उत्पादनासाठी खते, औषधे, बी-बियाणे, मजुरी आदी खर्च पाहता उत्पादनापेक्षा मालाची किंमत ५० टक्क्यांपेक्षा कमी येत आहे. या आंदोलनस्थळी उपबाजार केंद्राचे व्यवस्थापक शरद धोंगडे, नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी़ वाय़ मुजावर यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांची बाजू समजून घेतली. बाजार कमिटी व जिल्हाधिकारी यांना माहिती कळविण्यात येईल, अशी माहिती मुजावर यांनी या वेळी दिली़ (वार्ताहर)टोमॅटोला सध्या एकरी खर्च सुमारे २ लाख रुपये इतका येतो. त्यामध्ये साधारण १५०० कॅरेट उत्पादन निघते़ परंतु शेतकऱ्याच्या हातात मात्र ३० ते ४० हजार रुपये येतात़ त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे़ शेतकऱ्यांनी केलेल्या कोणत्याही शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे़
नारायणगावला टोमॅटो फक्त दीड रुपया किलो
By admin | Published: April 01, 2016 3:29 AM