पुणे : ‘ब्रँड फॅक्टरी’ यातील कथा या आजच्या काळात नवी व्यवस्था, नव्या तंत्रज्ञानाने निर्माण केलेले प्रश्न मांडणाऱ्या व त्याची उत्तरे शोधणाऱ्या आहेत, म्हणून त्या उद्याच्या किंवा येऊ घातलेल्या काळाच्या कथा आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी केले.
औरंगाबाद येथील मुक्त सृजन पत्रिकेने आयोजित केलेल्या या आॅनलाइन मुक्त चर्चेत सासणे यांच्यासह ज्येष्ठ लेखिका-कवयित्री अंजली कुलकर्णी, लेखक बाळासाहेब लबडे व पुस्तकाचे लेखक मनोहर सोनवणे उपस्थित होते.
मनोहर सोनवणे यांची कथा ही आधुनिकोत्तर कथा आहे. जागतिकीकरणानंतरच्या काळातील माणसाचे जगणे या कथांमध्ये आहेच, पण उद्याच्या माणसाच्या जगण्याची चर्चाही त्या करीत आहेत. आपण व्यक्तिकेंद्री व्यवस्था निर्माण करीत आहोत. स्वत:च्या पलीकडे विचार करण्यास माणूस तयार नाही, अशा स्थितीत माणुसकीचे काय झाले आहे आणि काय होऊ घातले आहे, हे या कथा अधोरेखित करतात, म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत, असे मत ससाणे यांनी संग्रहातील काही कथांचा उल्लेख करीत मांडले.
या कथांमधील चित्रदर्शी शैली व जादुई वास्तवाच्या तंत्राच्या (मॅजिकल रिलिझम) वापरातून वास्तवाचे कलात्मक दर्शन या कथांमधून होते, असे अंजली कुलकर्णी म्हणाल्या.
या कथांमधील व्यक्तिरेखा नव्या संस्कृतीने उभ्या केलेल्या द्वंद्वात सापडलेल्या माणसांचे प्रतिनिधित्व करतात, असे बाळासाहेब लबडे म्हणाले. जग खुले झाले, बाजार खुला झाला, पण माणसाचे माणूसपण मात्र बंदिस्त, क्षीण होत गेले, ही खंत या कथांच्या मुळाशी असल्याचे लेखक मनोहर सोनवणे यांनी सांगितले.
मुक्त सृजन पत्रिकेचे संपादक प्रा. महेश खरात यांनी सूत्रसंचालन केले.
--------------------------