पुणे : मायबाप सरकार आमच्यावर दया करा, उंटावरून शेळ्या हाकणे बंद करा, मी अधिकारी आता झालोय भिकारी, खूप झाल्या समित्या आता हव्यात नियुक्त्या, अधिवेशन संपले अन् सरकार झोपले अशा सरकारविरोधी घोषणा देत पुढाऱ्यांनो आता तरी जागे व्हा, अन्यथा अनेकजण स्वप्नील लोणकर होतील, असा इशारा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेत अंतिम निवड होऊनही नियुक्ती न मिळालेल्या उमेदवारांनी सरकारला दिला.
एमपीएससीकडून राज्यसेवा २०१९ परीक्षा ४१३ पदांसाठी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल १९ जून २०२० ला लागून वर्ष झाले. तरीसुद्धा निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली नाही. नियुक्ती देण्यासाठी लावलेल्या दिरंगाईचा निषेध करण्यासाठी तसेच झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी नवीन निवड झालेले उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार आदी पदांवर निवड झालेल्या उमेदवारांनी घोषणाबाजी केली.
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करत सरकारने एक वर्ष नियुक्त्या पुढे ढकल्या. आता न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. तरीसुद्धा सरकार नियुक्ती देण्यास चालढकल करत आहे. अभ्यास करून अधिकरी होऊनही सरकार नियुक्ती देत नसल्याने उमेदवार नैराश्यात गेले आहेत. आर्थिक अडचणींचा सामान करीत आहेत. तसेच ताणतणावात असल्याने जीवन जगणे कठीण होत आहे. त्यामुळे सरकारने आणखी उमेदवारांच्या आत्म्यहत्यांची वाट न बघता तत्काळ नियुक्ती द्यावी, अशी मागणी केली आहे.
---------------------
३६५ उमेदवारांच्या नियुक्तीला अडचण नाही. शासन मुद्दाम वेळकाढूपणा करतंय. शासनाने उमेदवारांच्या भविष्याशी खेळू नये. सरकारच्या हातपाय पडतो. आम्हाला नियुक्ती द्या.
- राम लेंडेवाड
-------------------------
नियुक्तीसाठी सरकारला वर्षभराचा कालावधी लागतो, हे दुर्दैव आहे. तत्काळ नियुक्ती द्यावी, नाहीतर सरकारला विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
- समा आक्कमवाड