पुणे : खोलवर चढाया व भक्कम पकडी असा चतुरस्त्र खेळ करीत बंगाल वॉरियर्स संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या हरियाणा स्टीलर्स संघावर ३९-३२ अशी मात करीत प्रो कबड्डी स्पर्धेत अनपेक्षित निकाल नोंदविला. पूर्वार्धात हा सामना १७-१७ असा बरोबरीत होता.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्या इतकाच हरियाणा स्टीलर्स व बंगाल वॉरियर्स यांच्यातील सामना विलक्षण चुरशीने खेळला गेला. दोन्ही संघांमध्ये सुरुवातीपासूनच आघाडी घेण्यासाठी सतत चढाओढ दिसून आली. हरियाणा संघाकडून विनय व शिवम पठारे यांनी खोलवर चढाया केल्या तर बंगाल संघाकडून मनिंदर सिंग व प्रणय राणे यांनी जोरदार चढाया करीत अधिकाधिक गुण वसूल करण्याचे प्रयत्न केले. पूर्वार्धात काही सेकंद बाकी असताना बंगाल वारियर्सने लोण नोंदवित १७-१७ अशी बरोबरी साधली. मध्यंतराला हीच बरोबरी होती.
उत्तरार्धातही दोन्ही संघांनी आघाडी घेण्याचे प्रयत्न केले. शेवटची चार मिनिटे बाकी असताना बंगालने ३३-२७ अशी आघाडी घेतली होती. त्यांनीही आघाडी वाढवत सामन्यावरील पकड घट्ट केली. अखेर ही लढत त्यांनी ३९-३२ अशी जिंकली. त्यांच्याकडून मनिंदर सिंग (११ गुण) व प्रणय राणे (६ गुण) यांनी जोरदार चढाया केल्या. मनजीत व फाझल अत्राचेली यांनी प्रत्येकी तीन गुण नोंदविले. पराभूत संघाकडून विनय (दहा गुण) व शिवम कटारे (८ गुण) यांची लढत अपुरी पडली.