पुणे : अल्पवयीन मुलीला बहिणीच्या घरी नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि ६८ हजार रुपयांचा दंड ठोठावला. सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा निकाल दिला.
अश्पाक सलीम बागवान (वय २८, रा. मिठानगर, कोंढवा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत १६ वर्षीय मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. जून २०१७ मध्ये हा प्रकार घडला होता. मुलगी शाळेत जात असताना बागवान हा तिचा पाठलाग करायचा. घटनेच्या दिवशी त्याने तिला ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला आवडतेस. मला तुला काही सांगायचे आहे,’ असे तिला सांगितले. त्यानंतर बागवानने मुलीला त्याच्या बहिणीच्या घरी नेले व तेथे तिच्यावर अत्याचार केला. ही बाब कोणाला सांगितली तर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, अशी धमकी त्याने तिला दिली. त्यानंतरही आरोपी मुलीला त्रास देऊ लागल्याने याबाबत मुलीच्या आईने तक्रार दिली.
या खटल्याचे कामकाज सरकारी वकील सुनील हांडे आणि ॲड. मिलिंद दातरंगे यांनी पाहिले. पोलीस हवालदार महेश जगताप आणि पोलीस नाईक अंकुश केंगले यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली. दंडाच्या रकमेपैकी ३५ हजार रुपये मुलीला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावी. दंडाची रक्कम न भरल्यास चार महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे निकालात नमूद आहे.