पुणे : सैन्य दलाच्या वर्दीचा गैरवापर करुन महिलेला भुरळ पाडून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या लष्करातील भगोड्याला सिंहगड पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्याविरूद्ध पुणे, नगर, लातूरमध्ये फसवणूकीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. प्रशांत भाऊराव पाटील (वय ३१ रा. कुंपटगिरी ता. खानापूर जि. बेळगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
शादी डॉट कॉम वेबसाईटद्वारे प्रशांतने पुण्यातील एका महिलेसोबत ओळख वाढवून लग्नाच्या आमिष दाखविले. तिला श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात भेटायला बोलावले. त्यानुसार ती मंदिरात आली असताना त्याने महिलेला सैन्य दलात नोकरीला असून सच्चा देशभक्त असल्याचे भासविले. तिला आपण आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात गणपती दर्शन घेऊन करु असे सांगितले. तेथून त्याने ड्रेस बदलायचा आहे, असे सांगून तिला कारमधून नवले पुलजवळील एका लॉजवर नेले.
आम्ही देशासाठी दिवसरात्र दहशतवाद्याशी लढतो असे बोलून भावनिक करुन तिच्यावर अत्याचार केला. महिलेने आरडाओरडा करु नये म्हणून त्याने सैन्य दलाच्या वर्दीची शपथ तिला घातली. त्यानंतर तिला गाडीत बसवून आपल्याला कर्तव्यावर जायचे आहे असे सांगून महिलेला शनिवारवाडा परिसरात सोडून तो निघून गेला. त्यानंतर या महिलेने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने तिचा फोन ब्लॉक केल्याचे आढळून आले. त्यामुळे फिर्यादी यांना संशय आल्यामुळे तिने सिंहगड रोड पोलिसाकडे फिर्याद दिली.
लष्कराचा संबंध असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे आणि पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी आणि शंकर कुंभार यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा माग काढून पथक नगरला गेले. तेथे आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सैन्य दलात भरती झाल्यानंतर २०१८ पासून कर्तव्यावर रुजु झाला नसल्याचे सांगितले. त्याशिवाय २०१८ पासून नोव्हेंबर २०२१ पर्यंत त्याने पुणे, नगर, लातुर याठिकाणी फसवणुकीचे ५ गुन्हे केल्याची कबुली दिली. प्रशांत पाटील या लखोबा लोखंडेला न्यायालयाने १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली असून अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास सिंहगड रोड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.