लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस असल्याची बतावणी करत प्रवाशांना लुबाडणार्या तोतयाला लोहमार्ग पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली.
अविनाश भारत भुर्लेकर (वय २४, रा. शिंदखेरा, ता. हुमनाबाद, जि. बिदर, कर्नाटक) असे या तोतयाचे नाव आहे. भुर्लेकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने अशाप्रकार सिकंदराबाद, हैद्राबाद, दादर, सीएसटी या ठिकाणी पोलीस असल्याचे सांगून प्रवाशांना फसवल्याची कबुली दिली आहे.
याबाबतची माहिती अशी, संतोष पासवान (वय १८, रा. बिहार) हे ६ डिसेंबर रोजी दुपारी सव्वादोन वाजता गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवरील आरक्षण केंद्रावर आले होते. त्यावेळी त्याने पोलीस असल्याचे सांगून तिकीट बुकिंगच्या फऑमवर किती पैसे असतात, ते लिहायचे असेल असे सांगून त्यांच्याकडील ११ हजार रुपये घेतले व त्यांना आधार कार्डची झेरॉक्स काढून आणण्यास सांगितले. पासवान झेरॉक्स काढण्यासाठी गेले असताना त्याने पैसे घेऊन पळ काढला होता.
पोलिस असल्याची बतावणी करत नागरिकांना लुटणारा स्टेशन परिसरात येणार आहे. त्यानुसार पोलिस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील, अपर अधीक्षक कविता नेरकर-पवार यांच्या मार्गदर्शऩाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मौला सय्यद, सुरेशसिंग गौड यांनी बुकिंग ऑफिस व प्लॅटफार्म येथे सापळा लावून संशयित तरुणाला ताब्यात घेतले. ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर, हवालदार सुनिल कदम, अनिल टेके, अनिल दांगड,स्वप्निल कुंजीर, बेबी थोरात, केंद्रे, आळंदे, कुंजीर यांच्या पथकाने केली.
----
आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून,त्याने पोलिस असल्याची बतावणी करत विविध ठिकाणी गुन्हे केल्याचा अंदाज आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी लोहमार्ग पोलिसांशी संपर्क करावा.
- सुरेशसिंग गौड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक लोहमार्ग पुणे