पुणे : मुंबईत पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी करून पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील लॉजमध्ये राहणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने अटक केली. पवन ऊर्फ मिलिंद हरिश्चंद्र सावंत (वय ३७, रा. गावदेवी, डोंबिवली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून बेल्ट, नेमप्लेट जप्त करण्यात आल्या.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ऑपरेशन ऑलआउटनुसार कारवाई सुरू आहे. गुन्हे शाखेचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना तोतया पोलीस अधिकारी पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील लॉजमध्ये राहत असल्याची माहिती सुरेंद्र साबळे, राकेश खुणवे, प्रवीण भालचिम, अशोक शेलार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून लॉजवर छापा टाकला. त्याठिकाणी पवन सावंत आढळून आला. त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीत तो सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. मुंबईतील काही पोलीस ठाण्यात पवन विरुद्ध गुन्हे दाखल आहेत. तो पुण्यात कशासाठी आला होता, याचा तपास पोलीस करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर, एपीआय संदीप जमदाडे, शोभा क्षीरसागर यांनी केली.
------------------------------