पुणे : गाडीत काचा लावून एखादी व्यक्ती विनामास्क वाहन चालवत असेल तर कारवाई होत नाही. आम्ही दोघे पती पत्नी आहोत आणि गाडीच्या काचाही लावून चाललो आहे. असे असताना सुध्दा तुम्ही मास्क घातला नाही म्हणून दंड का आकारता? म्हणून विचारणा करणाऱ्या महापालिकेतील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला मंगळवारी एक हजार रूपये दंड भरावाच लागला.
याबाबत हकीकत अशी की, महापालिकेतील आरोग्य विभागातील त्या महिला अधिकारी आपल्या पतीसोबत बंडगार्डन परिसरातून चारचाकी गाडीतून प्रवास करीत होत्या. यावेळी त्यांनी मास्क घातला नव्हता किंबहुना तो बोलताना गळ्यावर होता़ याचवेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना अडविले.तेव्हा या दोघांनीही मास्क लावून गाडीची काच खाली करून अडवणूकीबाबत विचारणा केली. त्यावेळी तुम्ही मास्क लावला नाही म्हणून विना मास्कची दंडाची रक्कम तुम्हाला भरावीच लागेल, असा सूर त्या पोलीस कर्मचाऱ्याने आवळला. तेव्हा आम्ही दोघे पती-पत्नी आहोत,मीही आरोग्य अधिकारी आहे व माझे पतीही डॉक्टर आहेत. काचा बंद करून मास्क घातल्यावर गुदमरल्यासारखे होते असे त्या पोलीस महोदयांना सांगितले. मात्र ते काहीही असो मला माहित नाही तुम्ही विना मास्क लावून गाडीत बसला आहात व तुम्हाला दंड भरावाच लागेल यावर पोलीस कायम राहिले.
दरम्यान त्यांनी तुम्ही गाडीजवळ येण्यापूर्वीच मास्क लावलाही आहे. परिणामी आम्ही काही नियम मोडला नाही, असेही या दाम्पत्याने पोलीसांसमोर स्पष्ट केले. परंतु या हुज्जतीत अखेर पोलिसांपुढे त्यांना नमते घ्यावे लागले व अधिकचा वाद न घालता १ हजार रूपये दंड भरून ते पुढे मार्गस्थ होणे भाग पडले
मंगळवारी हा एक प्रकार समोर आला असला तरी शहरात वारंवार असे प्रकार होत असून, खाजगी चारचाकी गाडीतून काच लावून घरात एकत्र राहणाऱ्या कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांनाही मास्कचा हा प्रश्न सतावत आहे.
---------------------------------