पुणे : मालदीव येथील तीन मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यामुळे तेथील सरकारने तिघांना निलंबित केले असून, भारतातील ट्रॅव्हल कंपन्यांनी मालदीवच्या टूर रद्द केल्या आहेत. परिणामी मालदीवला जाणारे विमाने देखील कंपन्यांनी रद्द केल्याचे सांगितले आहे. पुण्यातून मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांचा प्लान देखील मागे घेण्यात आला आहे. टूर कंपन्यांनी मालदीवऐवजी इतर ठिकाणी जाण्याचे पर्याय सुचविणे सुरू केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच मालदीव दौऱ्यावर हाेते. तिथे गेल्यानंतर तेथील तीन मंत्र्यांनी मोदींवर टीका केली. त्यामुळे तेथील सरकारने त्या तिन्ही मंत्र्यांचे निलंबन केले. त्याचा परिणाम भारतातील टूर कंपन्यांवर देखील झाला आहे. भारतीय पंतप्रधानांवर टीका केल्याने मालदीवला जाणारे विमाने आणि टूर रद्द करून पर्यटकांना इतर बेटांचा पर्याय देण्यात येत आहे. त्याचा फटका मालदीवला मोठ्या प्रमाणावर बसणार आहे. देशभरातून टूर मालदीवला जातात. त्या सर्वांनी आता मालदीवला बॉयकॉट केले आहे. सोशल मीडियावर देखील बॉयकॉटमालदीव असा ट्रेंड सुरू आहे.
दरवर्षी भारतातून लाखो पर्यटक मालदीवला जातात. २०२२ मध्ये भारतातून १५ लाख पर्यटक मालदीवला गेले होते. तर २०२३ मध्ये सुमारे १७ लाख ५७ हजार पर्यटकांनी मालदीवची सैर केली होती. त्यामुळे मालदीवला मोठे उत्पन्न भारतीय पर्यटकांकडून मिळत होते. ते आता बंद होणार आहे.
इंडियन चैंबर्स ऑफ कॉमर्सने देखील त्यांच्या टूर आणि ट्रॅव्हल एजंन्सीला मालदीवचे बुकिंग रद्द करण्यासाठी सांगितले आहे. तसेच ईझीमायट्रीप कंपनीने देखील मालदीवला यात्रा घेऊन न जाण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी अनेक विमाने रद्द करावी लागली.
मालदीवच्या मंत्र्यांनी आपल्या पंतप्रधानांवर टीका केली. त्यामुळे आपल्या लोकांची चिडचिड होत आहे. त्याचा फटका पर्यटनावर होऊ लागला आहे. मालदीवला जाणारी विमाने रद्द झाली, काही कंपन्यांनी टूर रद्द केल्या आहेत. मालदीवला जाणारे लोक आता लक्षद्वीपला जाण्यासाठी चौकशी करू लागले आहेत. परंतु, जशी मालदीवला जाण्याची कनेक्टिव्हीटी आहे तशी अजून लक्षद्वीपला नाही. लक्षद्वीपला पायाभूत सुविधा नाहीत. तिथे फाइव्ह स्ट्रार हॉटेल तेवढे नाहीत. विमानांची ये-जा नाही. परंतु, आता लोकांची मानसिकता मालदीव ऐवजी लक्षद्वीपला जाण्याची झाली आहे. तिथे चांगल्या सुविधा मिळाल्या तर भविष्यात पर्यटन खूप वाढेल. - मिलिंद बाबर, गिरीकंद हॉलीडेज