लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : टाळेबंदी (लॉकडाऊन) काळात बाहेर पडण्यास मज्जाव असल्याने नागरिकांना पर्यटनासाठी जाता आले नाही. आता उन्हाळी पर्यटनाचा दुसरा हंगाम आला तरी अनेक पर्यटन संस्थांनी रद्द झालेल्या सहलीचे कोट्यवधी रुपये पर्यटकांना परत दिले नाहीत. पैसे परत मिळावे यासाठी पर्यटकांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून ग्राहक आयोगाकडे तक्रार केली आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च-२०२० मध्ये देशात टाळेबंदी जाहीर केली. संपूर्ण जनजीवन ठप्प पडले. त्यावेळी पर्यटनाचा हंगाम होता. त्यासाठी अनेकांनी पर्यटन कंपन्यांच्या माध्यमातून देश-परदेशात पर्यटनासाठी अगाऊ आरक्षण केले होते. साथीच्या रोगामुळे सहली झाल्या नाहीत. पर्यटन कंपन्यांनी त्याचे पैसे परत देणे आवश्यक होते. अनेक कंपन्यांनी नऊ-दहा महिन्यांनंतरही पैसे परत दिले नाहीत.अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडे विविध २२ कंपन्यांच्या तक्रारी आल्या आहेत. ग्राहक मंचाच्या माध्यमातून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दावा दाखल केला आहे. आयोगाने त्यावर येत्या २६ फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली आहे.कोट विविध पर्यटक कंपन्यांना ग्राहकांनी २.२ कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिलेली आहे. कोरोनाच्या साथरोग काळात सर्व पर्यटन ठप्प झाले. या काळातील रक्कम व्याजासह मिळावी यासाठी ग्राहक मंचाने संबंधित कंपन्यांना नोटीस पाठविली होती. अनेकांनी त्याला उत्तर दिले नाही. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दावा दाखल केला आहे.- विजय सागर, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे महानगरकोट एका टूर्सच्या माध्यमातून एप्रिल-मे २०२० मध्ये युरोपात सहलीसाठी जाणार होतो. टाळेबंदीमुळे यात्रा रद्द झाली. कंपनीला मेलद्वारे भरलेले पैसे देण्याची मागणी केली. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर भरलेल्या पैशांपैकी २५ हजार रुपये प्रशासकीय खर्च म्हणून कापला. उरलेल्या पैशांच्या माध्यमातून डिसेंबर २०२० अखेरीस सहल आखण्यास सांगण्यात आले. मात्र, तोपर्यंत कोरोनाची स्थिती निवळली नव्हती. तसेच, परिस्थिती बदलल्याने आता पर्यटनाचा बेत रद्द झाला आहे. त्यामुळे कंपनीने पैसे देणे अपेक्षित होते. त्यासाठी ग्राहक मंचाच्या माध्यमातून दावा दाखल केला आहे.- चंद्रहास कुलकर्णी, पर्यटक