पुणे : पुणे फेस्टिवल ही पुण्याचीच नाही तर महाराष्ट्राची ओळख झाली आहे. पुढील वर्ष फेस्टिवलचे तिसावे वर्ष आहे. त्यानिमित्त राज्य सरकारच्या वतीने ३० लाख रुपये देण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केली.पुणे फेस्टिवल समिती, केंद्र सरकारचा पर्यटन व माहिती विभाग, राज्य सरकारचे पर्यटन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने साज-या होणा-या गणेश फेस्टिवलचे शुक्रवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत उद््घाटन झाले. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, जलसंपदामंत्री विजय शिवतारे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव, चंद्रकांत खैरे आदी मान्यवर उपस्थित होते. फेस्टिवलच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार यावर्षी दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि निवृत्त नौदल अधिकारी आनंद खांडेकर यांना जाहीर करण्यात आला. पुण्यातील १०० वर्षांपेक्षा जुन्या मंडळांचाही या वेळी गौरव करण्यात आला.रावल म्हणाले, ‘‘सलग २९ वर्षे अशा एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करणे ही सोपी गोष्ट नाही, मात्र कलमाडी यांना ती साधलेली आहे.’’कलमाडी यांच्या आयोजनाचे कौतुक करताना बापट म्हणाले, ‘‘त्यांच्या प्रयत्नाने पुण्याला वेगळी ओळख मिळवून दिली.’’शत्रुघ्न सिन्हा व घई यांनी पुण्यातील जुन्या आठवणी सांगितल्या. दोघांनीही पुणे हे पहिले प्रेम असल्याचे जोशात सांगितले. घई यांनी तर पुण्याच्या प्रभात रस्त्यानेच आपल्याला पत्नी मिळवून दिली असे सांगून त्यावरही कडी केली.
पुणे फेस्टिवलला निधी देणार, पर्यटनमंत्र्यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 1:28 AM