वेल्हे : तालुक्यातील राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला. त्यावेळी या हल्ल्यापासून बचाव करताना एका पर्यटकाचा सुवेळा माचीवरून १ हजार ५०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली़. ही घटना रविवारी (दि़ २९) सायंकाळी घडली़ सुजय भगवान मांडवकर (वय २०, रा़ बोरघर, ता. खेड, जि़ रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे़.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी : सुजय मांडवकर आपल्या चार ते पाच मित्रांसमवेत राजगडावर पर्यटनासाठी आला होता. गड फिरून झाल्यानंतर दुपारी चार वाजता हे सर्व जण सुवेळा माचीजवळ आले असता आग्यामोहोळाने हल्ला केला. यावेळी हे सर्व जण जिकडे मिळेल तिकडे पळू लागले. त्यावेळी सुजय सुवेळा माचीच्या तीन खांबिटका या कड्यावरून १५०० फूट खाली पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या साहाय्याने सुजय याचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. ........पर्यटक गडाच्या तटाच्या खालच्या बाजूने गडाला प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न करतात. त्यांना रस्ते माहीत नसल्याने नव्या पाऊलवाटा तयार करून प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी तटाखाली असणारे आग्या मोहोळ जागे होते़. तसेच काही पर्यटक अंगावर सुगंधी अत्तर लावून आलेले असतात. त्यामुळे या मधमाशा पर्यटकांवर हल्ला करतात, असे पुरातत्त्व विभागाचे प्रमुख विलास वाहने यांनी सांगितले.
राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे दरीत पडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 4:42 PM