धनकवडी : कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री जन्मलेल्या कात्रज प्राणी संग्रहालयातील पौर्णिमा , गुरु , सार्थक व आकाश या वाघाच्या बछड्यांना आज (रविवार) सकाळी ११ वाजता पर्यटकांना पाहण्यासाठी खंदकात सोडण्यात आले. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने बछड्यांना पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.
कात्रज प्राणी संग्रहालयातील वाघ रिध्दी आणि बागीराम या वाघांच्या जोडीने २३ आँक्टोबर ला या चार बछड्यांना जन्म दिला होता. ही बछडे आता सुदृढ स्थितीत असून रविवारी सकाळी ११ वाजता प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांच्या उपस्थितीत आकाश, गुरु, सार्थक आणि पोर्णिमा या बछड्यांना खंदकात पर्यटकांना पाहण्यासाठी सोडण्यात आले.
या चारही बछड्यांची देखभाल चांगली झाल्याने वजन ही वाढले आहे. प्राणी संग्रहालयातील वातावरण भावल्याने हे सर्व बछडे सुदृढ बनले आसून वजन २५ ते ३० किलो झाले आहे. मोकळ्या वातावरणात बछडे दंगामस्ती आणि मुक्त संचार करीत मोकळ्या वातावरणाचा आनंद लूटत होते.