पुणे : थायलंडच्या सहलीसाठी पर्यटकांकडून ४ लाख ३९ हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १० नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरात घडला. मोईज मेघजानी, मोहम्मद मेहंदीभाई मेघनानी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी श्वाखार तिवारी (वय २७, रा. विठ्ठलनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. तिवारी आणि त्यांच्या मित्राला थायलंड येथे फिरण्यासाठी जायचे होते. त्यांनी आरोपींच्या हॉटेल ड्रीमलँड कॅनोट येथील कार्यालयात जाऊन १ लाख ७६ हजार रुपये देऊन बुकिंग केले होते. त्यांना प्रवासासाठी तिकीट व अन्य बुकिंग उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले होते. आरोपींनी त्यांना खोटी तिकिटे ई-मेलद्वारे पाठवली. अशाच प्रकारे आरोपींनी आझम अली खान यांची १ लाख ९५ हजार व दीपक दर्यानी यांची ६८ हजारांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.
टुरिस्ट कंपनीकडून पर्यटकांची फसवणूक
By admin | Published: November 17, 2016 4:29 AM