पुणे : बाजारपेठेत दिवाळीच्या वस्तूंची रेलचेल असून, खरेदीची लगबग देखील सुरू आहे. त्याच वेळी पर्यटकांनी मात्र दिवाळी सुटीचा बेत आखात कोकणासह आपल्या आवडत्या ठिकाणी सहलीचा बेत आधीच आखून ठेवला आहे. अगदी लक्ष्मीपूजनदेखील निसर्गाच्या सान्निध्यातच साजरे करणार असल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने कोकण नेहमीच पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले आहे. नागरिकांच्या या पर्यटनप्रेमामुळे एमटीडीसीलादेखील पर्यटनाचे वार्षिक कॅलेंडर खुले करावे लागले. नागरिकही आपल्या सुटीचे वार्षिक कॅलेंडर तयार करताना दिसत आहेत. शनिवार, रविवारला जोडून येणाऱ्या सुट्या, दिवाळी, ख्रिसमसच्या सुट्या, उन्हाळी पर्यटन असे कॅलेंडर नेहमीच फुल्ल असते. आता तर नागरिक दिवाळी घरी साजरी करण्यापेक्षा घरापासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात साजरी करण्याला प्राधान्य देत आहेत. तारकर्ली, हरिहरेश्वर, वेळणेश्वर, गणपतीपुळे, महाबळेश्वर, कार्ला, माथेरान, माळशेज, भंडारदरा, पानशेत या ठिकाणाला पर्यटकांची चांगलीच पसंती मिळत असून, दिवाळीतील २५ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीतील ९० टक्के हॉटेल्सच्या रुम्स आरक्षित झाल्या आहेत. पुणे शहरातील हौशी पर्यटक पानशेत येथील एमटीडीसीच्या रिसॉर्टला आवर्जून भेट देत आहेत. त्याचा दर दोन व्यक्तींसाठी सोळाशे ते ३२०० रुपये आहे. या शिवाय तारकर्ली येथील हाऊस बोटीलादेखील पर्यटकांकडून चांगली मागणी आहे. त्याचा दोन व्यक्तींचा एका दिवसाचा दर ७ हजार १०० ते ९ हजार ३०० असा आहे. ही बोट पर्यटकांना ८ ते १० किलोमीटर दूर समुद्रात घेऊन जाते. दिवाळीतील या बोटीचे आरक्षणदेखील ९० टक्के झाले असल्याची माहिती एमटीडीसीच्या प्रादेशिक व्यवस्थापक वैशाली चव्हाण यांनी दिली. (प्रतिनिधी)
पर्यटकांची दिवाळी यंदा कोकणात
By admin | Published: October 11, 2016 2:24 AM