डिंभे : पावसाळ्याचे दिवस सुरू होताच आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील निसर्गसौंदर्यात भर पडत आहे. आंबेगावतालुक्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या डिंभे गावच्या पुढील निसर्ग पर्यटकांच्या मनाला साद घालत असून, पोखरी घाटात सध्या पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे.आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील सृष्टी सौंदर्यात येथील हिरवाईने भर घातली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून डिंभे गावच्या पुढे एक फाटा श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे तर दुसरा फाटा डिंभे धरणाला वळसा घालून आहुपे खोºयाकडे जातो. भीमाशंकरकडे जाताना पोखरी घाटातील सौंदर्य व खाली गोहे गावाजवळ असणारा बंधारा पर्यटकांच्या मनाला भुरळ घालत आहे.एकंदरीतच पावसाळा सुरू होताच हिरवाईने नटलेले डोंगर,गोहे पाझरतलाव व डिंभे धरणाचे विस्तीर्ण जलाशय पर्यटकांच्या मनाला भुरळ घालत आहे. त्यातच शनिवार, रविवार या रस्त्यावरील वर्दळ वाढली असून सुट्यांमुळे पोखरी घाटात पर्यटकांची गर्दी वाढू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.गोहे गावाजवळील पहिल्या वळणावरील धबधबा व घाट चढून गेल्यावर धरण ठिकाणावर अनेक पर्यटक थांबल्याचे पाहावयास मिळतात. मात्र, गर्दी वाढत असली, तरी आलेले पर्यटकांच्या गाड्या अनेकदा रस्त्यावरच थांबल्याने या घाटात वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याचेही चित्र अनेकदा पहावयास मिळते.
पोखरी घाटात पर्यटकांची वर्दळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 1:01 AM