लोकमत न्यूज नेटवर्कभुलेश्वर : संपूर्ण राज्यात एक जागृत देवस्थान म्हणून नावारुपाला आलेल्या पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील श्रीक्षेत्र भुलेश्वर मंदिरावरील बुरुज मोडकळीस आले आहेत. यामुळे हे त्वरित दुरुस्त करण्याची मागणी माळशिरस ग्रामस्थांकडून होत आहे. श्रीक्षेत्र भुलेश्वर मंदिराचा पुणे पूर्व पुरंदर पुरातन शिवालय असा पुरातन उल्लेख आढळतो. आदिलशहाचे सरदार मुरार जोगदेव यांनी पुण्याच्या संरक्षणासाठी १६२४ रोजी या ठिकाणी दौलत मंगळगढीची स्थापना केली. काही काळ पुण्याचा कारभार भुलेश्वर येथून चालत असल्याचे पुरातन बखरीत आढळते. या मंदिराला जवळपास २७ लहान-मोठे बुरुज असल्याचे काही जाणकार सांगतात. मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा मारली तर अनेक बुरुज पडलेल्या अवस्थेत आढळतात. त्यातील तीन बुरुज आज इतिहासाची साक्ष देतात. बाकीचे बुरुज कोठे गेले, हाही आज भाविकांना पडलेला प्रश्न आहे. आज जे बुरुज अस्तित्वात आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. यामुळे येथील शिल्पसौंदर्य भाविकांच्या मनाला हुरहूर लावून जाते. पुण्याच्या संरक्षणासाठी जरी या मंदिराची उभारणी झाली असल्याचे वयोवृद्ध सांगत असले तरी या मंदिराच्या संरक्षणासाठी बुरुज बांधलेले आहेत. या मंदिराचे आक्रमण थोपवणारे बुरुज दुरुस्त होणे गरजेचे आहे, अशी मागणी या ठिकाणी येणारे भाविक करीत आहेत.
भुलेश्वर मंदिरावरील बुरुज मोडकळीस
By admin | Published: May 13, 2017 4:19 AM