डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील पंधरा गावांना बीएसएनएल कंपनीचे टॉवर मंजूर झाले आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नांतून हे टॉवर मंजूर झाले असून वर्षानुवर्षे नॉट रीचेबाल असणारी आंबेगाव तालुक्यातील दुर्गम खेडी आता रिचेबल होणार आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील काही गावांत अजूनही मोबाईलच्या रेंज मिळण्यास अडचणी येत होत्या. या भागात बीएसएनएलचे कंपनीचे टॉवर व्हावेत अशी लोकांची मागणी होती. त्या नुसार राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दोन महीन्यापूर्वी संबंधित विभागाला सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
बीएसएनएल कंपनीने केलेल्या सर्व्हे नुसार तालुक्याच्या दुर्गम भागातील साकेरी, मेघोली, नांदूरकीचीवाडी, फुलवडे ,पिंपरी, सावारली, कुशिरे बुद्रुक, पाटण, न्हावेड, बोरघर, तिरपाड, आघाने, पिंपरगणे, म्हाळुंगे तर्फे आंबेगाव आणि तालुक्याचे शेवटचे टोक असणाऱ्या आहुपे गावांसाठी बीएसएनएल कंपनीचे एकूण पंधरा टॉवर मंजूर करण्यात केले आहेत. टॉवर उभारण्याचे काम एप्रील २०२३ अखेर पर्यंत पूर्ण होणार असून संबंधित गावच्या ग्रामपंचायतीने योग्य जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन माजी पंचायत समिती सभापती संजय गवारी यांनी केले आहे.ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होतील त्या ठिकाणी लगेच काम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बीएसएनएल कंपनीकडून देण्यात आली.