लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : १२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटले आणि सर्वत्र हाहाकार माजला. त्या काळी छोट्या असलेल्या पुण्यातील लोक मुठा नदीकाठी पेठांमधील जुन्या वाड्यांमध्ये, चाळींमध्ये वास्तव्यास होते. पुरामुळे पेठा जलमय झाल्या. घरे, माणसे आणि गुरे वाहून गेली. सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. पुण्याची पूर्णत: वाताहत झाली. हे मातीचे धरण का आणि कसे फुटले? अभियंते आणि राजकीय व्यक्तींना या धोक्याची पूर्वकल्पना आली नव्हती का? तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ही युद्धजन्य परिस्थिती कशी हाताळली आणि पूरग्रस्तांचे पुनर्वसन कसे झाले या सर्व प्रश्नांचा मागोवा घेणाऱ्या कादंबरीचे लेखन प्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका आश्लेषा महाजन यांनी केले आहे.
पानशेत धरण फुटल्याच्या घटनेला सोमवारी (दि. १२) साठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून ‘इंकिंग इनोव्हेशन्स’ने प्रकाशित केलेल्या ’१२ जुलै १९६१’ या कादंबरीचे प्रकाशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते आॅनलाइन स्वरूपात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर आणि नगरसेविका अश्विनी कदम या वेळी उपस्थित राहणार आहेत.
आश्लेषा महाजन म्हणाल्या, पानशेत पुराला पन्नास वर्षे झाली, तेव्हापासून मी या कादंबरी लेखनावर काम करीत होते. त्याला दहा वर्षे झाली. पूरग्रस्त आणि पुराशी संबंधित शंभराहून अधिक लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांचे अनुभव वाचकांना रुचेल अशा स्वरूपात कादंबरीमध्ये मांडले आहेत. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी या कादंबरीविषयी दिलेला अभिप्राय मलपृष्ठावर देण्यात आला आहे. पानशेत धरण फुटल्याच्या घटनेनंतर त्या वर्षीच्या दिवाळी अंकांमध्ये स्फुट लेख प्रसिद्ध झाले होते. मात्र, तत्कालीन पोलीस अधिकारी मधुकर हेबळे यांनी लिहिलेल्या ‘पानशेत प्रलय आणि मी’ या व्यक्तिगत अनुभवांवर आधारित पुस्तकाचा अपवाद वगळता पुण्याला हादरवून टाकणाऱ्या या घटनेवर मोठ्या प्रमाणावर साहित्यनिर्मिती झाली नाही.
----------------------------------------------