बारामती : वाळू उपसा रोखणाऱ्या पथकातील दोघाजणांना अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. २२) डोर्लेवाडी ते मेखळीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत कऱ्हा नदी पात्राजवळ ही घटना घडली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी डोर्लेवाडी ग्रामपंचायतीचे लिपिक सोमनाथ पोपट भिले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.त्यानुसार शुभम शिवाजी शिंदे (रा. डोर्लेवाडी, ता. बारामती), महेश देवकाते (रा. जांभळी फाटा, मेखळी), ऋषिकेश शेळके (रा. काटेवाडी, ता. बारामती) व त्यांचा एक अनोळखी साथीदार या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस पाटील नवनाथ मदने यांनी भिले यांना नदीतून ट्रॅक्टरच्या साह्याने वाळू चोरी करत त्याचा साठा केला जात असल्याचे सांगितले. त्यानंतर भिले, मदने, कोतवाल ज्ञानदेव मदने, सामाजिक कार्यकर्ते अजित जाधव यांनी गाव कामगार तलाठी गजानन पारवे यांना फोनवरून याबाबत माहिती दिली. त्यावर पारवे यांनी नदीपात्रात कोण आहेत, ते बघा असे सांगितले.त्यामुळे हे चौघे वाळु उपशाच्या ठीकाणी गेले. त्यावेळी तेथे एक ट्रॅक्टर उभा होता. ट्रॅक्टर जवळून पोलिस पाटील व कोतवाल पात्राकडे गेले. भिले व अजित जाधव ट्रॅक्टरजवळ थांबले. यावेळी ट्रॅक्टर चालक शिभम शिंदे व ऋषिकेश शाळके यांनी, हा भिले सारखाच पाळत ठेवतो, वाळू चोरू देत नाही, याला आज संपवून टाकू असे म्हणत ट्रॅक्टर चालू करत तो जोरात या दोघांच्या दिशेने आणत अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी दुचाकी बाजूला ढकलून देत रस्त्याच्या बाजूला उड्या मारत जीव वाचवला. मोठ्याने आरडाओरडा केला. त्यामुळे पात्राच्या दिशेने गेलेले पोलिस पाटील व कोतवाल हे पळत आले. ते येताना दिसताच आरोपी तेथून पसार झाले.
या चौघांनी नदीपात्रात जाऊन पाहणी केली असता तेथे १४ ते १५ ब्रास वाळूचा साठा केल्याचे दिसून आले. सरपंच पांडूरंग सलवदे यांना बोलावून घेत सदरचा प्रकार सांगण्यात आल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. याप्रकरणी चौघांविरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्नासह सरकारी कामात अडथळा, खान व खनिज अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.