शिरूर : ऊसतोड मजुरांच्या झोपडीवर ट्रॅक्टर गेल्याने त्याखाली चेंगरून ऊसतोड मजुरी करणारे पती- पत्नी ठार झाल्याची घटना आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास शिरूर तालुक्यातील निर्वी गावाजवळ घडली.
गणपत कचरू वाघ (४६) व शोभा गणपत वाघ (४१, रा. ममदापूर, ता. येवला, जि. नाशिक) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक राहुल अण्णा सोनावणे (३४, रा. निर्वी, त. शिरूर ) यावर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, व्यंकटेश साखर कारखान्याची ऊसतोड टोळी निर्वी - न्हावरे मार्गावरील कनसे वस्तीजवळ आपल्या झोपड्या उभारून राहत आहेत. सोमवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास ट्रक्टर हा कारखान्यावर ऊस खाली करून आला होता. चालकाने ट्रॅक्टर भरधाव वेगाने पळवला झोपेत त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपडीवर गेला. यावेळी झोपडीत असलेले गणपत वाघ व शोभा वाघ यांच्या अंगावर ट्रक्टर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रक्टर शेजारील कालव्यात जाऊन पडला. ट्रॅक्टर चालकाने तेथून पळ काढला. त्याच्यावर शिरूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.