बारामती :कऱ्हा नदीपात्रातून होत असलेला वाळूउपसा रोखण्यासाठी गेलेल्या पथकातील दोघांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे घडली. याप्रकरणी चौघांविरोधात जिवे मारण्याच्या प्रयत्नासह सरकारी कामात अडथळा, खाण व खनिज अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम शिवाजी शिंदे (रा. डोर्लेवाडी, ता. बारामती), महेश देवकाते (रा. जांभळी फाटा, मेखळी), ऋषिकेश शेळके (रा. काटेवाडी, ता. बारामती) व त्यांचा एक अनोळखी साथीदार या चौघांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. डोलेर्वाडी ग्रामपंचायतीचे लिपिक सोमनाथ पोपट भिले यांनी याबाबत फिर्याद दिली. गुरुवारी (दि.२२) रोजी डोर्लेवाडी ते मेखळीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नदीपात्राजवळ ही घटना घडली. पोलीस पाटील नवनाथ मदने यांनी भिले यांना नदीतून ट्रॅक्टरच्या साह्याने वाळूचोरी करत त्याचा साठा केला जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर भिले, मदने, कोतवाल ज्ञानदेव मदने, सामाजिक कार्यकर्ते अजित जाधव यांनी गावकामगार तलाठी गजानन पारवे यांना फोनवरून या घटनेची माहिती दिली. नदीपात्रात कोण आहेत, ते बघा असे सांगितल्याने हे चौघे तिकडे गेले. त्या वेळी तेथे एक ट्रॅक्टर उभा होता. ट्रॅक्टर जवळून पोलिस पाटील व कोतवाल पात्राकडे गेले. भिले व अजित जाधव ट्रॅक्टरजवळ थांबले. या वेळी ट्रॅक्टर चालक शिभम शिंदे व ऋषिकेश शाळके यांनी, हा भिले सारखाच पाळत ठेवतो, वाळू चोरू देत नाही, याला आज संपवून टाकू असे म्हणत ट्रॅक्टर चालू करत तो जोरात या दोघांच्या दिशेने आणत अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी दुचाकी बाजूला ढकलून देत रस्त्याच्या बाजूला उड्या मारत जीव वाचवला. मोठ्याने आरडाओरडा केला. त्यामुळे पात्राच्या दिशेने गेलेले पोलिस पाटील व कोतवाल हे पळत आले. ते येताना दिसताच आरोपी तेथून पसार झाले. या चौघांनी नदीपात्रात जाऊन पाहणी केली असता तेथे १४ ते १५ ब्रास वाळूचा साठा केल्याचे दिसून आले.सरपंच पांडुरंग सलवदे यांना बोलावून घेत सदरचा प्रकार सांगण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांना फोनवरून कळवत फिर्याद देण्यात आली.
----------------------------