पुणे : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणा-या करदात्यांविरूद्ध कार्यवाही सुरू ठेवली असून, ११० कोटींपेक्षा अधिक रकमेची खोटी बिले दिल्याप्रकरणी पुण्यातील एका व्यापा-यास राज्य जीएसटी विभागाकडून अटक करण्यात आली आहे. राज्यात आत्तापर्यंत मुंबईमध्ये ३ कारवाया करण्यात आल्या असून, पुण्यातील ही मोठी कारवाई आहे.
बाबुशा शरणप्पा कसबे असे अटक करणा-याचे नाव आहे. कसबे यांनी मे. खुशी टेंडर्स वस्तू व सेवाकर कायदा २०१७ अंतर्गत नोंदणी दाखला घेतला. या कंपनीच्या माध्यमातून कसबे याने ११० कोटी रकमेची फक्त बिले देऊन 16.86 कोटींचा आय.टी.सी पुढील खरेदीदारांना पाठवला. त्याचप्रमाणे हा कर भरायला लागू नाही यासाठी अनेक बोगस कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय दाखवलेल्या बोगस खरेदी बिलातून सुमारे 16.57 कोटी रकमेचा इनपुट टॅक्स जमा करून घेतला असल्याचे कारवाईदरम्यान उघडकीस आले. मुख्य न्यायदंडाधिकारी पुणे यांच्या न्यायालयाने या व्यापा-याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कसबे यांचे हे कृत्य हा एक दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा असून, वस्तू व सेवाकर कायदा 2007 नुसार 5 वर्षे तुरुंगवास आहे. जीएसटी विभागाच्या वतीने न्यायालयात महेश झंवर यांनी कामकाज पाहिले.
राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त दत्तात्रय आंबेराव, सहायक राज्यकर आयुक्त दत्तात्रय तेलंग यांच्या प्रयत्नातून ही अटक कार्यवाही करण्यात आली.
-------------------------------------------
राज्य वस्तू व सेवाकर विभागाला कारवाई दरम्यान बोगस कंपन्यांची माहिती मिळाली आहे. त्यांच्याविरुद्ध आगामी काळात कारवाई केली जाणार आहे.
- दत्तात्रय आंबेराव, राज्यकर उपायुक्त
---------------------------------------