बारामती: शहरातील सिनेमा रस्त्यालगतच्या ९९ वर्षांपुर्वी मिळालेल्या भाडेतत्वावर जागेच्या प्रश्नाबाबत व्यापाऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांना साकडे घातले. या संदर्भात ज्येष्ठ नेते पवार यांनी सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही व्यापा-यांच्या शिष्टमंडळास दिली आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर यांनी दिली.
मंगळवारी(दि २) व्यापाऱ्यांनी पवारांची गोविंदबाग निवासस्थानी भेट घेत निवेदन दिले. माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात संदीप गुजर, आदेश वडूजकर, शैलेश साळुंके, चंद्रकांत शिंगाडे, मनोज मुथा, किरण इंगळे, विजय जोशी, नितीश शहा, सुरेंद्र मुथा, फणिंद्र गुजर, सुनील शिंदे, फखरुद्दीन बारामतीवाला, सतीश तावरे आदी यावेळी पवार यांच्या भेटीसाठी उपस्थित होते.
बारामती नगरपालिकेने १९२२ मध्ये ९९ वर्षांच्या कराराने सिनेमा रस्त्यावरील काही जागा भाडेतत्त्वावर देऊ केल्या होत्या. त्या वेळी झालेल्या लिलावात चांगली किंमत आल्याने ९९ वर्षाच्या कराराच्या मुदतीनंतर पुन्हा पुढे ९९ वर्षांसाठी जागा हक्क ठेवणाऱ्या व्यक्ती व व्यापाऱ्यांना देण्यात याव्यात, असा ठराव झाला होता. दरम्यान सरकारनेही २०२१ मध्ये कोणताही सत्ताप्रकार असलेल्या जागा भोगवटादारांना रुपांतरीत करुन मालकी हक्काने देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बारामती नगरपालिकेने ही जागा नगरपालिकेच्या मालकीची व्हावी असा ठराव केला होता. ही जागा नगरपालिकेच्या मालकीची झाल्यास ५०० हून अधिक कुटुंबाना याची झळ बसण्याची भीती व्यापा-यांनी व्यक्त केली आहे.
तसेच या ठरावाविरोधात व्यापा-यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रक्रीयेलाच स्थगिती दिली आहे. सांगलीमध्ये सत्ताप्रकार रद्द करुन व्यापा-यांना जागा मालकी हक्काने देण्याचा निर्णय झाल्याची बाब व्यापा-यांनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी पवार यांनी देखील व्यापारी वर्गाच्या मागणीची दखल तातडीने घेतली. तसेच संबंधितांना या बाबत योग्य सूचना दिल्या. या संदर्भात पवार यांनी सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही व्यापा-यांच्या शिष्टमंडळास दिली असल्याची माहिती जवाहर वाघोलीकर यांनी दिली. दरम्यान,गुरुवारी(दि३ ) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासोबत या व्यापा-यांची गुरुवारी महत्वाची बैठक होणार आहे.