लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आम्ही दोन दिवस वाट पाहणार आहोत, दरम्यान मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती करू, ऐकले तर ठीक, अन्यथा निर्णय घ्यावाच लागेल असा इशारा पुणे शहर व्यापारी महासंघाने दिला आहे.
“महापालिका एक सांगते, मग राज्य सरकार दुसराच आदेश काढते. मग परत महापालिका सुधारित आदेश काढते. हा काय खेळ लावलाय? अशाने व्यापारी देशोधडीला लागतील व कामगारही बेकार होतील,” अशा शब्दांत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ॲड. फत्तेचंद रांका यांनी बंदच्या आदेशाविषयी संताप व्यक्त केला. कोरोना कारणावरून सरकारने जाहीर केलेल्या बंदचा लक्ष्मी रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी मंगळवारी (दि. ६) सकाळी एकत्र येत निषेध केला. सरकार अनावश्यक बंद घोषीत करून दुकानदार व कामगारांच्या जगण्यावरच गदा आणत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊससमोरच्या पदपथावर सर्व दुकानदार जमा झाले. यावेळी लक्ष्मी रस्त्यावरील कापड दुकानांसह सर्व बाजारपेठ बंद होती. पदपथावर रांगेने उभे राहात व्यापारी व दुकानदारांनी बंदच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. काही हजार दुकाने व किमान लाखभर कर्मचारी यांची सरकार दैना करत आहेच, शिवाय खरेदीची गरज असणाऱ्या नागरिकांनाही त्रास देत आहे अशी टीका करण्यात आली.
दरम्यान राज्य सरकार व महापालिका आयुक्त यांच्या दोन वेगवेगळ्या परिपत्रकांमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. राज्य सरकारने किराणा, औषधे वगैरे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद म्हटले आहे. महापालिका आयुक्तांच्या आधीच्या परिपत्रकात दुकाने खुली राहतील असे होते. रात्री उशिरा त्यांनी सरकारी परिपत्रकाची री ओढली. त्यामुळे नक्की काय असा गोंधळ झाल्याची चर्चा व्यापाऱ्यांमध्ये आहे.
रांका यांनी निर्णयांमध्ये कोणतीही स्पष्टता नसल्याची टीका केली. या निर्णयांना कोणता वैद्यकीय आधार आहे तेही सरकारने जाहीर करावे असे ते म्हणाले. सर्व नियमांचे काटेकोर पालन करून व्यापारी पेठा सुरू ठेवणे सर्वांच्याच हिताचे आहे. नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करा. आम्ही मध्ये पडणार नाही असे ते म्हणाले.