पुणे : कॉंग्रेसच्या तिकिटावर उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवलेली मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतु मराठी कलाकार आणि राजकारण हे समिकरण महाराष्ट्राला नवे नाही.
निवडणुकीच्या रिंगणात थेट उतरणारे आणि विशिष्ट पक्ष-संघटनेच्या विचारांशी बांधिलकी मानणारे अशा दोन गटात मराठी अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आदी विभागले गेले आहेत. काहींचा राजकीय प्रवेश ‘फ्लॉप’ ठरला तर काहीजण थेट लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषदेत पोहोचले.
मराठी साहित्य-चित्रपटसृष्टीत ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून नावलौकिक मिळवलेले गजानन दिगंबर माडगूळकर, गीतकार ना. धो. महानोर, निर्माते रामदास फुटाणे, पी. सावळाराम यांनी विधानपरिषदेत प्रवेश केला. शांताराम नांदगावकर विधानपरिषदेत गेले. मात्र यातले कोणीही कोणत्याच राजकीय पक्षात सहभागी झाले नाहीत. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवली. ‘वस्त्रहरण’फेम मच्छिंद्र कांबळी यांनी ‘राष्ट्रवादी’कडून लोकसभा निवडणूक लढवली.
राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात असणारे ‘विनोदाचा बादशहा’ दादा कोंडके यांनी पुढे शिवसेनेचा जाहीर प्रचार केला आहे. अभिनेते शरद पोंक्षे, सुबोध भावे शिवसेनेच्या आघाड्यांचे पदाधिकारी राहिले आहेत. अभिनेते नंदू माधव, अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी ‘आप’कडून निवडणूक लढवली. ‘टीव्ही स्टार’ आदेश बांदेकर, दिगर्शक अभिजित पानसे शिवसेनेत आहेत.
महाभारत मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका निभावलेल्या नितीश भारद्वाज यांनी भाजपाकडून लोकसभेत प्रवेश केला. छत्रपती शिवाजी आणि संभाजी राजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रथम शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून खासदार म्हणून निवडून गेले. प्रिया बेर्डे, विजय पाटकर, प्रियदर्शन जाधव, कौस्तुभ सावरकर, सविता मालपेकर, गिरीश परदेशी यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.