पिंपरी : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या कामामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. या कामामुळे बाणेर रोड, गणेश खिंड रस्ते अरुंद झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये पिलरचे काम होणार आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीत भर पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी या मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशास मनाई केली आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. काकासाहेब डोळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार देहूरोड, वाकड, हिंजवडी, सांगवी वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे मेट्रो व दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या कामामुळे या चौकात मोठी वाहतूक कोंंडी होते. अवजड वाहनांमुळे दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व इतर वाहनांचा खोळंबा होतो. त्यामुळे अवजड वाहनांना या मार्गावर मनाइ करण्यात आली आहे.
वाहतुकीतील बदल
- मुंबईकडून पुण्याकडे येणारी जड-अवजड वाहने मुकाई चौकातून रावेत मार्गे तसेच भूमकर चौक, वाकड नाका येथून राजीव गांधी पुलावरून पुण्याकडे जाणार नाही. या मार्गावरील अवजड वाहने मुकाई चौकातून सरळ चांदणी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
- मुंबईकडून पुण्याकडे येणारी जड अवजड वाहने सेवा रस्त्याने भुमकर चौक, वाकड नाका, राधा चौक येथे येणार नाहीत. राधा चौकातून बाणेर मार्गे पुणे विद्यापीठाकडे जाण्यात बंदी केली आहे. या मार्गावरील वाहने भूमकर चौक, वाकड नाका, राधा चौक ओव्हर ब्रिजवरून सरळ चांदणी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
- जुन्या मुंबई - पुणे महामार्गाने मुंबईकडून पुण्याकडे येणारी जड अवजड वाहने सेंट्रल चौकातून पुढे चांदणी चौक मार्गे अथवा दापोडी हॅरिस पूल मार्गे पुण्याकडे जातील.