पुणे: तिथीप्रमाणे शुक्रवारी शिवजयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त मिरवणुकीचे आयोजन केल्याने शहरातील वाहतुकीत बदल केला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. मुख्य मिरवणूक भवानी माता मंदिरपासून सुरू होईल. रामोशी गेट चौक, नेहरू रोडने एडी कॅम्प चौकमार्गे डुल्या मारुती चौक, हमजेखान चौक, सोन्या मारुती चौक, फडके हौद चौक येथून लाल महाल चौकात संपणार आहे.
मिरवणूक सुरू असताना नेहरू रोडवरील वाहतूक बंद केल्यानंतर पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल. मिरवणूक पुढे जाईल, त्यानुसार वाहतुकीत बदल केली जाणार आहे. मिरवणुकीमुळे लक्ष्मी रोड, गणेश रोड, शिवाजी रोडवरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. तसेच या मार्गावर वाहने उभी करण्यास बंदी करण्यात येत आहे. लष्कर भागातील मिरवणूक खान्या मारुती चौकातून सुरू होऊन ट्रायलक हॉटेल चौक, न्यू मोदीखाना मार्ग कुरेशी मशिद, सेंट्रल स्ट्रीटने भोपळे चौकात येऊन तेथून आसूडखान चौकापर्यंत मिरवणुक असेल.
खडकी भागातील मिरवणूक खडकी बाजार येथील शिवाजी पुतळा येथून सुरू होईल. कॅन्टोंमेंट हॉस्पिटल चौक, आसूरखान चौक, नवी तालीम चौक, आंबेडकर चौक, क्राऊन हॉटेल चौक, डी आर गांधी चौक, महाराष्ट्र बँक मार्ग शिवाजी पुतळा इथपर्यंत मिरवणूक असेल. मिरवणूक जशी पुढे जाईल, तसतशी मागील रस्त्यांवरील वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.