पुणे : नवरात्र उत्सव काळात तांबडी जोगेश्वरी, भवानी माता मंदिर, चतु:शृंगी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. त्यांना सुलभपणे दर्शन घेता यावे. यासाठी वाहतुकीत बदल केले आहेत.
तांबडी जोगेश्वरी मंदिर
तांबडी जोगेश्वरी मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेऊन अप्पा बळंवत चौक ते बुधवार चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीकरीता बंद करण्यात येणार आहे. बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक अशी एकेरी वाहतूक चालू राहील. अप्पा बळवंत चौकाकडून बुधवार चौकाकडे येणाऱ्या वाहनचालकांनी बाजीराव रोडने सरळ पुढे शनिवार वाडा येथे वळसा घेऊन इच्छित स्थळी जावे. लक्ष्मी रोडवरील गणपती चौक ते तांबडी जोगेश्वर मंदिर दरम्यान प्रवेश बंद करण्यात आला. वाहनचालकांनी लक्ष्मी रोडने सरळ सेवासदन चौकातून उजवीकडे वळून बाजीराव रोडवर सरळ शनिवारवाडामार्गे इच्छितस्थळी जावे. तांबडी जोगेश्वर मंदर, शनिवार पेठेतील अष्टभुजा देवी मंदिर परिसरात नवरात्रीच्या काळात सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंग करीता बंदी घालण्यात आली आहे.
भवानी माता मंदिर
रामोशी गेट चौक ते जुना मोटार स्टॅन्ड या दरम्यानचा भवानी माता मंदिरासमोरील महात्मा फुल रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना दोन्ही बाजूने बंद करण्यात येणार आहे. या रस्त्यावरील पार्किंगही बंद करण्यात येत आहे. संत कबीर चौक बाजूने येणारी रामोशी गेट चौकाकडून भवानी माता रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांनी एडी कॅम्प चौकातून डावीकडे वळून भारत सिनेमा पदमजी चौक, उजवीकडे वळून जुना मोटार स्टँडपर्यंत येऊन इच्छितस्थळी जावे. ढोले पाटील चौक बाजूने येऊन रामोशी गेट चौकी समोरुन भवानी माता मंदिर रस्त्यावरुन जुना मोटार स्टँडकडे जाणार्या वाहनांनी भगवान बाहुबली चौकातून जुना मोटार स्टँडकडे जावे. माणिकदास महाराज चौक ते भगवान बाहुबली चौक या दरम्यानच्या जाधव रस्त्यावरील एकेरी मार्ग वाहतूक निर्बंध नवरात्र कालावधी पुरता शिथील करण्यात येत आहे.