पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रविवारी (दि. ३०) शहरात आगमन होणार असून पालखी आगमन, मुक्काम आणि प्रस्थान यानिमित्ताने शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. पालखी आगमना निमित्त शहरातील प्रमुख रस्ते दुपारनंतर वाहतुकीस बंद राहणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहीदास पवार यांनी केले.
जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी आगमनानिमित्त रविवारी आवश्यकतेनुसार बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्थानक, मरिआई गेट चौक, कमलनयन बजाज चौक, जुन्या मुंबई - पुणे मार्गावरून पुण्याकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमनानिमित्त कळस फाटा ते विश्रांतवाडी चौक, येरवडा येथील मनोरूग्णालय (मेंटल काॅर्नर) ते आळंदी रस्ता चौक, चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता, नवीन डॉ. आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक, होळकर पूल ते साप्रस चौकीपर्यंत वाहतूक बंद राहील. या कालावधीत फक्त आळंदीकडे जाणारे रस्ते आवश्यकतेनुसार बंद राहणार असून, अन्य रस्ते सुरू राहणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले.
शहरात पालख्यांचे आगमन झाल्यानंतर दोन्ही पालख्या एकाच मार्गावरून मुक्कामस्थळी पोहोचतील. अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, संचेती चौक, वेेधशाळा चौक, वीर चापेकर चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, तुकाराम पादुका चौक, गोखले स्मारक चौक (गुडलक), खंडोजी बाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, विजय चित्रपटगृह चौक, सेवासदन चौक, बेलबाग चौक, बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदीर, मोती चौक, सोन्या मारुती चौक, हमजेखान चौक, डुल्या मारुती चौक, नाना पेठ पोलिस चौकी येथून श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी अरुणा चौक मार्गे श्री निवडुंग्या विठोबा मंदिर येथे मुक्कामास येईल. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी अशोका चौकमार्गे भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदीर येथे मुक्कामास येईल. पालख्यांच्या मुक्कामानिमित्त नाना-भवानी पेठेतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.
वाहतुकीस बंद असणारे रस्ते- कंसात पर्यायी मार्ग..
- गणेशखिंड रस्ता (रेंजहिल चौक ते संचेती रुग्णालय) पर्यायी मार्ग- रेंजहिल-खडकी पोलिस ठाणे, पोल्ट्री चौक, जुना मुंबई पुणे महामार्ग आणि रेंज हिल, सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता
- फर्ग्युसन रस्ता ( खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक) पर्यायी मार्ग- कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल
- छत्रपती शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक) पर्यायी मार्ग- कुंभार वेस, मालधक्का चौक, आरटीओ चौक, जहांगीर हॉस्पिटल, बंडगार्डन रस्ता
- टिळक चौक ते वीर चापेकर चौक, पर्यायी मार्ग- शास्त्री रस्ता, म्हात्रे पूल
- लक्ष्मी रस्ता (बेलबाग चौक ते टिळक चौक), पर्यायी मार्ग- शिवाजी रस्ता, हिराबाग टिळक रस्ता, शास्त्री रस्ता
शास्त्री रस्त्यावरील सेनादत्त पोलिस चौकी ते खंडोजीबाबा चौक रस्ता बंद
जड वाहनांना बंदी..
पालख्यांच्या आगमनानिमित्त शहर येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सोलापूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक चौफुला आणि थेऊर मार्गे वळवण्यात आली आहे. तर, सासवडकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक नारायणपूर, कापूरहोळमार्गे वळवण्यात आली आहे. ३० जून रोजी पालखी आगमन आणि २ जुलै रोजी पालखी प्रस्थानावेळी संपूर्ण पालखी मार्गावर येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर वाहतुकीस रस्ते खुले करून देण्यात येणार आहेत. पालखी पुढे जाईल त्याप्रमाणे आवश्यकतेनुसार वाहतूक सुरु करण्यात येणार आहे.