पुणे : पाषण-सूस पूल परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. यात पाषाणकडून सूसकडे जाणाऱ्या पुलाच्या अलीकडे उजवीकडे वळण्यास मनाई केली आहे. या भागासाठी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.
बंगळुरू बाह्यवळण मार्ग परिसरातील सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांनी सूस पूल ओलांडताना २०० मीटर अंतरावर उजवीकडे वळून ननावरे भुयारी मार्गाने इच्छितस्थळी जावे. पाषाणमार्गे साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी साई चौक पाषाण येथून डावीकडे वळून सुतारवाडी, पाषाणमार्गे इच्छित स्थळी जावे. हिंजवडी, सूस तसेच मुंबईकडे जाण्यासाठी सूस पूल ओलांडून २०० मीटर अंतरावर उजवीकडे वळून सेवा रस्त्याने मुंबईकडे तसेच सूसकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
येथे नाेंदवा हरकती-सूचना...
वाहतूक बदलांविषयी काही हरकती किंवा सूचना असल्यास नागरिकांनी वाहतूक विभाग, पोलिस उपायुक्त, जेल रस्ता, येरवडा, पुणे-४११००६ येथे लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.