पुणे : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त होणारी गर्दी विचारात घेता शहरातील विविध भागांत वाहतूक बदल केला आहे. १९ तारखेला सकाळी पाच वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर सर्व प्रकारच्या बसेस व वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत वाहनधारकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाकडून दिली.
शिवाजी रोडवरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांसाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक, टिळक चौक-टिळक रस्ताने इच्छितस्थळी जाता येणार आहे. तर, स. गो. बर्वे चौकातून मनपा भवनकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी चौकातून जंगली महाराज रस्ता, झाशी राणी चौक येथून डावीकडे वळावे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे व फुटका बुरूजाकडे येणारी वाहतूक बंद करणार असून वाहनचालकांना केळकर रोडने सरळ पुढे जाता येईल. लक्ष्मी रोडवरून जाणारी वाहतूक संत कबीर चौकातून बंद करून सर्व वाहने नेहरू रोडने सेव्हन लव्ह चौकाकडे तसेच उजवीकडे वळून पावर हाउस चौकातून पुढे जातील. तर, बाजीराव रोडवरून मनपाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार पुरम चौकातून टिळक रोडने पुढे खंडोजीबाबा चौकातून इच्छिस्थळी जातील. तर, गणेश रोडवरून फडके हौदकडे येणारी वाहने ही देवजीबाबा चौकातून डावीकडे वळून पुढे हमजेखान चौकातून स्वारगेट अथवा इच्छितस्थळी जातील, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली.