पिंपरी : देहू येथे बुधवारी (दि. २७) जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्त देहूगाव व परिसरात वाहतुकीत बदल केला आहे. सोमवार (दि. २५) ते बुधवार (दि. २७) या कालावधीत हा बदल केला आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
तळवडे, महाळुंगे, चाकण वाहतूक विभाग अंतर्गत वाहतुकीत बदल केले आहेत. वाहतुकीतील हा बदल सोमवारी दुपारी १२ वाजतापासून ते बुधवारी रात्री नऊ वाजतापर्यंत राहणार आहे. यावेळी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी हे मार्ग बंद राहणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी या कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
वाहतूक बदल पुढील प्रमाणे -
१ ) देहूगाव कमान (जुना मुंबई-पुणे महामार्ग) येथून देहुगावकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी प्रवेश बंद केला आहे. (सार्वजनिक वाहतूक बस व दिंडीतील वाहने वगळून)
२) महिंद्रा सर्कलकडून फिजित्सू कॉर्नर अथवा कॅनबे चौक /आयटी पार्क चौकाकडे येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांस प्रवेश बंदी केली आहे.
पर्यायी मार्ग महिंद्रा सर्कल ते निघोजे ते मोईफाटा मार्गे डायमंड चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.३) तळेगाव-चाकण रस्त्यावरील देहुफाटा येथून देहूगाव जाणाऱ्या रस्त्यावरून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद केला आहे. पर्यायी मार्ग : या मार्गावरील वाहने एच.पी. चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
४) नाशिक - पुणे महामार्गावरील चाकण तळेगाव चौक तसेच स्पायसर चौक येथून महिंद्रा सर्कल मार्गे आयटी पार्क / कॅनबे चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद केला आहे. पर्यायी मार्ग : १) या मार्गावरील वाहने ही मोशी भारतमाता चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. पर्यायी मार्ग २) या मार्गावरील वाहने महिंद्रा सर्कल चौक एचपी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
५) देहू कमान ते १४ टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद.
६) खंडेलवाल चौक ते देहू कमान (मुख्य) ते परंडवाल चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद.
७) जुना पालखी मार्ग (कंद पाटील चौक) ते झेंडे मळा (जकात नाका) जाणारी वाहतूक वन-वे (एकदिशा मार्ग) करण्यात आला आहे.