पुणे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सोलापूर रस्त्यावरील रेसकोर्स परिसरात जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याने या भागातील वाहतूक व्यवस्थेत ३१ ऑक्टोबरपर्यंत बदल करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
रेसकोर्स प्रवेशद्वार (जॉगिंग ग्राऊंड) ते रेसकोर्स मुख्य प्रवेशद्वार दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. घड्याळ चौक, आर्मी पब्लिक स्कूल चौक, एम्प्रेस गार्डन नाका या मार्गाने लष्कर तसेच पुणे शहराकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.
सोपानबाग परिसरातील नागरिकांनी रेसकोर्समार्गे न जाता लष्कर भाग तसेच पुणे शहरात पर्यायी मार्गाने जावे. पुणे शहरातून येणारी वाहने लष्कर भागातील मम्मादेवी चौक, भैरोबानाला चौकमार्गे इच्छितस्थळी जातील. रेसकोर्स मुख्य प्रवेशद्वाराजवळून उजव्या बाजूला वळून पाण्याची टाकीमार्ग टर्फ क्लब चौकातून डाव्या बाजूला वळून वाहनचालकांनी भैरोबानाला चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.