चाकण नगरपरिषदेच्या माध्यमातून पाइपलाइन टाकण्याचे काम गेली अनेक दिवसांपासून सुरू आहे. यासाठी जुना पुणे-नाशिक रस्त्याच्या कडेने इलेक्ट्रिक केबल टाकण्यासाठी खोदाई केली जात आहे. परंतु या सततच्या खोदाईमुळे वाहतूककोंडी होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असल्याने व्यावसायिकांना याचा त्रास होतो आहे. खोदाई केल्यानंतर वेगाने काम करणे गरजेचे असतानाही याकडे दुर्लक्ष केल्याने चाकणकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
चाकण नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्याने बहुतेक प्रभागातील कोरोनाच्या काळात रखडलेली विकासकामे पालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहेत. परंतु ठेकेदारांकडून काही कारणास्तव कामांमध्ये दिरंगाई होत आहे. याबाबत नगरपरिषदेकडून त्यांना कामे चांगल्या दर्जाची व वेळेत पूर्ण करण्यासाठी सांगण्यात येत आहे. नागरिकांना त्रास होईल असे काम करू नये, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना सांगितले.
रस्ता खोदाई केल्याने झालेली वाहतूककोंडी