लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर ; लग्न तिथी व सुट्टी म्हटली की पुणे नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी ही नित्याचीच असते. याचा प्रत्यय रविवारी पुन्हा एकदा आला. दुपारपासून रात्रीपर्यंत राजगुरुनगरमधून जाणाऱ्या महामार्गावर कोंडी झाली होती. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल झाले.
नाताळची आणि रविवारची सुट्टी त्यातच लग्न तिथी असल्याने पुणे नाशिक महामार्गावर रविवारी पुन्हा कोंडी झाली. सकाळपासुन महामर्गावर वाहनांची रांगा लागल्या होत्या. १० ते १२ पोलिस दिवसभर वाहतूक नियंत्रित करीत होते. तरीही कोंडीत वाढ होत होती. पुणे, पिंपरी चिंचवड आणि चाकण परिसरात नोकरी, शिक्षण, व्यवसाय या निमित्ताने उत्तर पुणे जिल्ह्यातील आणि नशिकपर्यत लोक मोठ्या प्रमाणावर राहतात. सलग सुट्या आल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशी घराबाहेर पडले. राजगुरुनगर मधून जाणारा महामार्ग अरुंद असल्याने आणि वाहतुकीला दोन अरुंद पूल, चार चौक, बसस्थानक आणि रस्त्याच्या कडेला उभी राहणारी वाहने यांचा अडथळा होत असल्याने रविवारी पुन्हा वाहतूककोंडी झाली.
फोटो ओळ: राजगुरुनगरमध्ये पुणे नाशिक महामार्गावर लग्नतिथी असल्याने दिवसभर झालेली वाहतुककोंडी.