परिसरातील बेशिस्त पार्किंगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, रस्त्यांवर वाहने सर्रासपणे पार्क केली जात असल्याने रस्ते अरुंद होत आहेत व वाहतूककोंडी व अपघातांचे प्रकार नित्याचेच झाले आहेत.
लोणी स्टेशन चौक परिसरात महामार्गावरील हॉटेलसमोर वाहने धोकादायकरीत्या उभी राहत असल्याने महामार्गावरील वाहनांना अडचणी येत आहेत. यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. सध्या लोणी काळभोर वाहतूक विभागाची कारवाई कवडीपाट टोल नाक्यावर जोरात सुरू असते. महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनांना अडवून त्यांच्यावर विविध नियमांचा बडका दाखवत दंड आकाराला जात आहे. परंतु लोणी स्टेशन परिसरात सेवा मार्गावर अनधिकृत पार्किंग करुन तासन्तास हॉटेलमध्ये जाणाऱ्यांवर कारवाई होत नाही. त्यामुळे हॉटलेचालकांवर पोलिसांची अर्थपूर्ण मेहरबानी असल्याची कुजबूज नागरिकांमध्ये आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलातून पुणे शहर पोलिसांत समावेश होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. यामुळे सध्या लोणी काळभोर उपविभाग या नावाने शहर पोलिसांचा वाहतूक विभाग लोणी काळभोर पोलीस हद्दीत वाहतूक नियमनाचे काम करत आहे.
--
चौकट
वाहतूक पोलिसांना चौकाचौकांतील वाहतूक सुरळीत करणे, रस्त्यात विनाकारण थांबलेल्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करणे, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करणे ही मुख्य कामे शासनाने नेमून दिलेली आहेत. मात्र लोणी काळभोर पोलिसांच्या वाहतूक विभागातील बहुसंख्य कर्मचारी वाहतूक पोलिसांची मुख्य कामे सोडून, रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना अडवून दंडवसुली
करण्याचे काम करत आहेत.