बारामती : शहरातील सिग्नल यंत्रणा अनियमित असल्याने शहरातील वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांचे प्रमाण वाढले आहे. सिग्नल यंत्रणा सुरू ठेवण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे. शहरातील भिगवण चौक, इंदापूर चौकातच सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यपिंैकी इंदापूर चौकातील सिग्नल यंत्रणा पूर्णपणे बंद आहे, तर भिगवण चौकातील सिग्नल अनियमितपणे सुरू असतो. विशेषत: सायंकाळी शाळा सुटल्यानंतर वाहतुकीच्या कोंडीचे प्रमाण वाढते. त्यातून वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे सिग्नल यंत्रणेमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय गुणवडी चौक, पंचायत समिती, तीनहत्ती चौक या ठिकाणीदेखील सुरक्षित वाहतुकीसाठी सिग्नल यंत्रणा बसविण्याची गरज आहे. एमआयडीसी चौकात असणारी मोठी वर्दळ लक्षात घेता, येथील सिग्नल यंत्रणा कायमस्वरूपी सुरू करण्याची गरज आहे. शालेय विद्यार्थिनीच्या अपघाती मृत्यूनंतर येथील सिग्नल यंत्रणा सुरू करण्याचा केवळ फार्स करण्यात आला. येथे सुरक्षेसाठी पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्तीदेखील करण्यात आली. मात्र, पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती आहे. येथे कामगारवर्ग, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सुरक्षित वाहतुकीसाठी एमआयडीसी चौकात कायमस्वरूपी सिग्नल कार्यान्वित असणे आवश्यक आहे.
वाहतूक विस्कळीत
By admin | Published: December 10, 2015 1:26 AM