पुणे : नागरिकांना वाहतुकीचे नियम आणि जनजागृती व्हावी यासाठी पुण्यात स्मार्ट सिटीतर्फे वाहतुकीचे शिक्षण देणारे उद्यान सुरु करण्यात येणार आहे. या संदर्भात नुकताच बॉश इंडिया फाउंडेशनसोबत करार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, स्मार्ट सिटीचे वसंत पाटील आणि बॉशचे मोहन पाटील उपस्थित होते.
चालू वेळेतील वाहतुकीची सद्यस्थिती या वाहतूक उद्यानात बघता येणार असून त्यावरून नागरिकांना थेट माहिती आणि शिक्षण दिले जाणार आहे. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप याबद्दल म्हणाले की, या उद्यानातून लोकांचा रस्ता सुरक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची आशा आहे. यासाठी आम्हाला महापालिका, ट्रॅफिक पोलीस आणि नगरसेवक संजय भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते म्हणाल्या की, नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे आकलन होण्यासाठी हे मोठे पाऊल ठरू शकते. लहान मुलांवर यामुळे वाहतुकीचे संस्कार होऊ शकतात.