पुणे - आमदार सत्यजीत तांबे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. ते सतत ट्विट करत अपडेट देत असतात. काही दिवसापूर्वी त्यांनी मुंबईतील ट्राफिकचा मुद्दा शेअर केला होता, आता त्यांनी पुण्यातील ट्राफिकचा मुद्दा मांडला आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी ट्विट करत पुण्यातील चांदणी चौकातील ट्राफिकची मुद्दा उपस्थित करत पुणेकरांच्या समस्या मांडल्या आहेत.
धनगर समाजातील नवविवाहित जोडपं थेट मनोज जरांगेंच्या भेटीला पोहचले अन्...
'आयटी हब' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात ट्राफिकच्या समस्येमुळे मागील काही वर्षांत बऱ्याच आयटी कंपन्या पुणे सोडून गेल्या होत्या. तरी देखील अजूनही शहरातील ट्रॅफिकचं चित्र तसंच असल्याचं दिसतंय. एनडीए म्हणजेच चांदणी चौकात मोठाले रस्ते आणि वळणावळणांमुळे कुठे व कसे जायचे, याबाबत प्रवासी संभ्रमात पडत आहेत. महत्त्वाचे म्हणजे पादचाऱ्यांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे वाहतुक नियंत्रण विभागाने याकडे लक्ष देऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशा आशयाची माहिती देणारे ट्विट आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.
चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन तर झाले, मात्र परिस्थिती अजून बिकट झालेली दिसतेय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३९७ कोटी खर्च करून ८ रॅम्प, २ सर्व्हिस रोड, २ अंडरपास, ४ पूल असे १७ किलोमीटर रस्त्याचे काम केलेले आहे. मात्र या रस्त्यांवर काही ठिकाणी मार्गदर्शक फलक आहेत, तर काही ठिकाणी फलक लावलेले दिसत नाहीत. यामुळे वाहनचालकांना रस्ता समजत नाही आणि जेथे फलक लावले आहेत ते दिसत नाहीत. रस्ता चुकला की नागरिकांना दोन-दोन किलोमीटर फिरून यावं लागत आहे, असे आ. तांबे यांनी सांगितले.
नवीन रस्ते झाले असले तरी पादचाऱ्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागतोय, तसेच सर्व दिशांनी एकत्र येणाऱ्या अनेक रस्त्यांमुळे अपघाताची भीतीही वाढली आहे. त्यामुळे फक्त वाहतूक कोंडीच नाही, तर लोकांची मानसिक कोंडी देखील होतेय. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी अवाढव्य खर्च करून नवीन रस्त्यांचा अट्टहास केला असला तरी समस्या काही सुटलेली दिसत नाही. हे सर्व बघता शहर विकासाला नियोजनाची जोड देणे, ही प्राथमिक गरज आहे हे स्पष्टपणे दिसतंय, असेही मत आ. सत्यजीत तांबे यांनी मांडले.
नकाशे कधी लागणार ?
महापालिकेतर्फे एनडीए चौकात ठिकठिकाणी कोथरूड, मुळशी, बावधन, सातारा व मुंबईकडे कसे जायचे, याचे नकाशे लावण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. परंतु या सर्वेक्षणाला सुरूवात झाली का? फक्त कागदावरच मर्यादित राहिले आहे, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे, असेही आ. तांबे यांनी सांगितले.