पुणे : वेळ दुपारी 12 ची...पुणे शहर व परिसरात पावसाच्या रिमझिम सरी काेसळत हाेत्या. रस्ते रिसरडे झाल्याने वाहतूकीचा वेग मंदावला हाेता. त्यातच एका रिक्षाच्या अारश्यामुळे भाेसरीतील नागरिकांना अर्धा तास वाहतूक काेंडीत अडकून पडावे लागले. एसटीची धडक लागल्याने एका रिक्षाचा अारसा तुटला. त्यामुळे रिक्षाचालकाने एसटी भररस्त्यात अडवून अर्धातास गाेंधळ घातला. त्यामुळे एसटीतील प्रवाशांबराेबरच वाहनचालकांना चांगलाच मनस्ताप झाला.
पुण्यावरुन शिर्डीला जाणारी एशियाड भाेसरी येथे अाली असताना तिचा एका रिक्षाच्या अारश्याला धक्का लागल्याने अारसा तुटला. वाहतूक काेंडी असल्यामुळे चालकाला रिक्षाचा अंदाज न अाल्याने अनावधानाने एसटी चालकाकडून अारसा तुटला. एसटी काही अंतर पुढे गेली. रिक्षाचालकाने या एसटीचा पाठलाग गेला तसेच काहीअंतर पुढे गेल्यानंतर एसटी अाडवली. रिक्षाचालकाने एसटीचालकाला फैलावर घेण्यास सुरुवात केली. अारेरावीची भाषा ताे करु लागला. अनावधानाने अारसा तुटल्याचे सांगत एसटी चालकाने त्याची माफीसुद्धा मागितली. परंतु रिक्षाचालक अारश्याचे पैसै भरुन द्या या मागणीवर अडून राहिला. हा सर्व प्रकार भररस्त्यात सुरु असल्यामुळे या भागात माेठी वाहतूक काेंडी झाली. एसटीतील प्रवाश्यांनी हस्तक्षेप न करता केवळ हा सर्व प्रकार बघत राहण्याचे धाेरण अवलंबले. अारश्याचे निम्मे पैसै द्या किंवा अारसाभरुन द्या असे रिक्षाचालक सातत्याने बाेलत हाेता. या सर्व प्रकारमुळे एसटीच्या प्रवाशांचा चांगला खाेळंबा झाला. अर्ध्यातासाहून अधिक काळ हे सर्व नाट्य चालल्यानंतर केवळ 70 रुपयांवर रिक्षाचालक मानला. त्यानंतर एसटी अापल्या पुढच्या प्रवासाला निघून गेली.
एसटी सुरु झाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास साेडला. काही अंतर पुढे गेल्यानंतर अापण हस्तक्षेप करायला हवा हाेता. रिक्षाचालकाला समजावायला हवे हाेते, अश्या बाता प्रवासी करु लागले हाेते.