पुणे : दुहेरी उड्डाणपुलाच्या कामासाठी अभिनव चौक ते पादचारी पुलापर्यंतच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूकडील एक लेन बंद करण्यात आल्याने शनिवारी कर्वे रस्त्यावर दुपारी वाहतुक कोंडी झाली. वाहतुक पोलिसांनी कोंडीची चाचपणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर या लेन बंद केल्या होत्या. सायंकाळी बॅरिकेडिंग काढल्यानंतर वाहतुक सुरळीत झाली. या प्रयोगामुळे मात्र संपुर्ण कर्वे रस्ता वाहतुक कोंडीमुळे गुदमरून गेला.
कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. या कामासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकापासून नळस्टॉप चॉकापर्यंत मेट्रोचे खांब उभारले जात आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूची एक लेन बंद करण्यात आली आहे. आता नळस्टॉप चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलापर्यंतचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे वाहतुक पोलिस व महामेट्रोकडून वाहतुक कोंडीची चाचपणी केली जात आहे. शनिवारी दुपारी अभिनव चौक ते एसएनडीटी विद्यापीठासमोरील पादचारी पुलापर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजुने एक लेन बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आली. दोन्ही बाजुचा पाच ते सात मीटर रस्ता वाहनांसाठी खुला होता. यावेळी नळस्टॉप चौकातील सिग्नल यंत्रणा बंद करण्यात आली.
या प्रयोगाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच अभिनव चौकात वाहतुक कोंडी झाली. चौकातून कर्वेनगरच्या दिशेने जाणारी आणि पौड रस्त्यावरून चौकाकडून येणारी वाहतुक संथ झाल्याने मागील बाजुच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. डेक्कन बाजुने अभिनव चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सावरकर स्मारकापर्यंत आणि पौड फाटा ते गरवारे महाविद्यालय चौकापर्यंत वाहतुक कोंडी झाली. दोन्ही बाजुने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने लगतच्या विधी महाविद्यालय रस्ता, कॅनॉल रस्ता, नळस्टॉप ते म्हात्रे पुल तसेच इतर रस्यांवरही कोंडी झाली. ही कोंडी फोडताना वाहतुक पोलिसांची दमछाक झाली. दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास बॅरिकेड्स काढून संपुर्ण रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर काही वेळात वाहतुक कोंडी कमी झाली.
रविवारी चक्रकार वाहतूक शनिवारी अभिनव चौक ते पादचारी पुलापर्यंतची एक लेन बंद करण्याचा प्रयोग केल्यानंतर रविवारी चक्राकार वाहतुकीचा प्रयोग राबविला जाणार आहे. पौड रस्त्याने येणारी वाहतुुक एसएनडीटी विद्यापीठासमोरून आठवले चौकाकडे वळविली जाईल. या चौकातून डेक्कनच्या दिशेने जाणारी वाहने उजवीकडे वळून अभिनव चौकात येतील. मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर या चौकातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी या दोन पर्यांयांचा विचार केला जात आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे वाहतुक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट केले.