मुंबई- सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांची मोठी गर्दी झाली असून वाहतुकीचा वेग मंदावला आहे. लोणावळा घाटात वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहनांची होणारी गर्दी पाहता खालापूर टोलनाक्यावर अधिकच्या सहा लेन सुरू करण्यात आल्या आहेत. तसंच बोरघाटात पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गाड्यांची मोठी गर्दी झाली आहे.
आज २८ एप्रिलला चौथ्या शनिवारची, २९ एप्रिलला रविवारची तर ३० एप्रिलला बुद्धपौर्णिमेची सुट्टी आहे. १ मे रोजी कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी आल्याने मुंबई आणि उपनगरांतील लोक मोठ्या संख्येने बाहेर फिरायला निघाले आहेत. द्रुतगती महामार्गावर खोपोली घाट ते अंडा पॉईंटपर्यंत वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे. बोरघाटापर्यंत ही वाहतूक कोंडी पोहोचली आहे. त्यामुळे दहा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी पर्यटकांना तासभर लागत आहेत.
तर, मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतुक कोंडी झाल्याने कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले आहे. माणगाव येथे ५ किमी पर्यंत वाहतुकीच्या रांगा लागल्या आहेत.