पुणे - सलग सुट्या व एक्स्प्रेस वे स्लो होणे हे एक समिकरणच बनले असल्याने वाहनचालक व प्रवाशांना मुंबई-पुणे प्रवास हा त्रासदायक वाटू लागला आहे. होळी सणाच्या सुट्टीसोबत शनिवार व रविवारची सुट्टी जोडून आल्याने या तीन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेण्याकरिता पर्यटक घराबाहेर पडले व गुरुवारी (1 मार्च) रात्रीपासूनच एक्स्प्रेस वे हा कासवगतीप्रमाणे बनला आहे. गुरुवारी रात्री 11 वाजल्यापासून दोन्ही बाजूंच्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र आज सकाळी मुंबईकडे येणारा मार्ग मोकळा झाला. पण पुण्याकडे जाणारी वाहतूक संथगतीने सुरू आहे.
गुरुवारी रात्री गोल्डन हावर्समुळे अवजड वाहने ही खोपोली व लोणावळा परिसरात रोखून धरली होती, ती उशिरा सोडण्यात आल्याने रात्रभर एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. शुक्रवारी (2 मार्च) पहाटेपासून वाहनांची संख्या वाढू लागल्याने पुण्याकडे येणार्या मार्गावर आडोशी बोगदा ते अमृतांजन पूलदरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाली नसली तरी अतिशय संथ गती वाहतूक सुरू असल्याने वाहनांच्या लांबपर्यत रांगा लागल्या होत्या. दरम्यान, आज दिवसभर एक्स्प्रेस वेवर असेच चित्र पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने या मार्गावरुन प्रवास करणार्या प्रवाशांनी वेळेचे नियोजन करुनच घराबाहेर पडावे अथवा पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. होळी, रंगपंचमी, शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्या आल्यानं या मार्गावर वाहतुकीचा ताण पाहायला मिळत आहे.