पुणे : प्रचाराचा शेवटचा दिवस व त्यात पावसाची रिमजीम सुरु असल्याने पुणे-सोलापुर रस्ता पुर्णपणे जाम झाला. दुपारी १२ वाजल्यापासूनच उपनगरात प्रचार रँली व पावसाचा जोर असल्याने वाहतुक कोंडी झाल्याचे समजत आहे. पुणे सोलापूर रस्त्यावर गोळीबार मैदान, पुलगेट, टर्फ क्लब, रेसकोर्स, भैरोबानाला, फातिमानगर चौक, सोपानबाग, रामटेकडी, वैदवाडी, हडपसर व पुढे १५ नंबर तसेच सासवड रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली. मुख्य रस्त्यावर वाहतुक जाम झाल्याने त्याला जोडणाऱ्या वानवडी, बी.टी कवडे रस्ता, भैरोबानाल्याला जोडणारे एम्प्रेस गार्डन रस्ता व भैरोबा रस्ता, कँम्प मधून येणारे रस्ते पुर्णपणे जाम झाले आहेत. दुपारपर्यंत सिग्नल सुरु होते परंतु वाहतुक नियंत्रित करण्यासाठी ते तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले होते. सायंकाळ पर्यंत भैरोबानाला व फातिमानगर येथील सिग्नल बंद होते. पाऊस येत असला तरी वानवडी पोलीस पावसात उभे राहून वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते. सकाळपासूनच पाऊस सुरु झाल्याने चारचाकी वाहने जास्त प्रमाणात रस्त्यावर आल्याने वाहतुक कोंडी झाल्याचा अंदाज वानवडी वाहतुक वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांनी व्यक्त केला आहे.
..................
निवडणूक कामासाठी पोलीस मनुष्यबळ वळवण्यात आल्यामुळे चौकांमध्ये अंमलदार नाहीत. त्याबरोबरच पावसामुळे अनेक ठिकाणचे सिग्नल बंद आहेत. संपूर्ण सोलापूर रस्त्यावर वाहतूक कोंडी होती. सोलापूर रस्त्याच्या समांतर रस्त्यांवर देखील कोंडी होती. भैरोबानाल इंप्रेस गार्डन रस्तावर देखील कोंडी होती. अगदी मांजरी पर्यंत कोंडी होती. पावसाचे कारण तर आहेच. त्यात मनुष्यबळाची कमतरता देखील कारण आहे. - राजेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक, हडपसर वाहतुक विभाग