पुणे : दिवाळीनंतरच्या परतीच्या वाहतुकीने संगमवाडी पुलासह सादलबाबा चौकापर्यंत सोमवारी दिवसभर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. येथील खासगी वाहनतळांवर खासगी प्रवासी बसेस मोठ्याप्रमाणावर आल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. त्यातच भर म्हणून प्रवाशांना घेण्यासाठी आलेली खासगी वाहने, रिक्षा व प्रवासी कार बेशिस्तपणे उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीच भर पडली. वाहतूक पाेलिसांनी ही वाहतूक काेंडी साेडविण्याचा प्रयत्न केला.
संगमवाडीतील खाजगी प्रवासी बस पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झालेली आहे . यामुळे अनेक लहान मोठे अपघात घडत असतात. सोमवारी सकाळी दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यामुळे राज्यभरातून पुण्यात परतणारी खासगी बसेस व वाहने संगमवाडी येथील बस थांब्यावर आली होती . त्यामुळे सकाळी दहा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली होती. नेहमीपेक्षा अधिक खासगी बसेस या परिसरात आल्यामुळे दैनंदिन शहराकडे जाणाऱ्या वाहनचालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागला. दिवाळीपूर्वी सुट्टीला शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांमुळे देखील अशाच प्रकारचे वाहतूक कोंडी झाल्याची तक्रार नागरिकांनी केली होती .मात्र वाहतूक पोलिसांकडून यासाठी कोणतेही नियोजन करण्यात आलेले नव्हते .शहराकडे जाणाऱ्या संगमवाडीच्या मुख्य रस्त्यावर अशाप्रकारे वाहतूक कोंडी झाल्यामुळे नागरिकांची चांगली गैरसोय झाली.
शहरातील मुख्य रस्त्यांवर मेट्रोसह विविध कामे सुरू असल्यामुळे शहरभर वाहतूक कोंडीची समस्या पुणेकरांना भेडसावत असते. त्यातच दिवाळीच्या सुटीनंतर परतीची वाहने शहरात आल्यामुळे या वाहतूक कोंडीचा नागरिकांना सामना करावा लागला. दरम्यान संध्याकाळी देखील सारखेच चित्र या भागात पाहायला मिळाले. संध्याकाळी सुद्धा खासगी बसेसमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या. कार्यालयांमधून घरी निघालेल्या नागरिकांना याचा माेठा मनस्ताप सहन करावा लागला. यावर लवकर ताेडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत अाहे.