पुणे : पुण्यातील सर्वात महत्त्वाचं एसटी स्टॅण्ड म्हणून स्वारगेट एसटी स्टॅण्ड अाेळखले जाते. महाराष्ट्राच्या काणाकाेपऱ्यातून एसटी बसेस या ठिकाणी येत असतात तसेच येथून सुटत असतात. खासकरुन दिवाळी अाणि इतर सणांच्या दिवशी येथून जास्तीच्या एसटी बसेस साेडल्या जातात. परंतु एसटी स्थानकात कशाही पद्धतीने एसटी बसेस लावल्यामुळे तसेच चालकांमध्ये समन्वय नसल्यामुळे एसटी स्टॅण्डमध्येच काेंडी हाेत असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे एसटी स्टॅण्डमधून एसटीला बाहेर पडण्यासाठीच पंधरा- वीस मिनिटे लागत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत अाहे.
स्वारगेट एसटी स्टॅण्डवर दरराेज माेठ्याप्रमाणावर एसटी बसेसची ये जा सुरु असते. विविध सणांच्यावेळी एसटी प्रशासनाकडून जादा गाड्या साेडल्या जातात. सध्या शाळांच्या दिवाळीच्या सुट्टा संपल्यामुळे एसटीला माेठी गर्दी झालेली पाहायला मिळत अाहे. त्यातच एसटी स्टॅण्डमध्ये कशाही पद्धतीने या बसेस लावण्यात येतात. अनेकदा काही बसेसे कुठेही लावल्या जात असल्याने प्रवाशांना अापल्या सामानसह धावपळ करावी लागते. त्यातच एखाद्या प्रवाशाला खासकरुन वयाेवृद्ध प्रवाशांना इजा हाेण्याची शक्यता असते. त्यातच एसटी स्थानकातून बसेस सुटताना एकदम अनेक बसेस बाहेर पडत असल्याने व एसटी स्थानकात प्रवेश करत असल्याने वाहतूक काेंडी हाेत असते. एसटी बसेसचे याेग्य नियाेजन करण्यात येत नसल्याने प्रवाशांना एसटी बसमध्येच अडकून पडावे लागते. त्यामुळे गाडी सुटल्यानंतरही 15 ते 20 मिनिटं एसटी स्थानकाबाहेर पडत नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.
पुण्याहून साेलापूरला जाणारा प्रसाद कदम म्हणाला, मी अाज स्वारगेटहून साेलापूरला सकाळच्या वेळी निघालाे हाेताे. साेलापूरहून माझी बॅंगलाेरला जाणारी ट्रेन हाेती. एसटी सुरु झाल्यानंतर एसटी स्थानकातील काेंडीमुळे पंधरा ते वीस मिनिटे बाहेर पडू शकली नाही. माझ्या सारख्या अनेक प्रवाशांना यामुळे एसटीतच अडकून पडावे लागले. त्यामुळे यावर स्वारगेट एसटी डेपाे प्रशासनाने पाऊले उचलायला हवीत.